बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एकच वाक्य बोलले

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राष्ट्रवादीतील दिग्गज नेते अर्ज भरतेवेळी उपस्थित होते. बारामतीची (Baramati) निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न महायुतीकडून होत होते. मात्र, काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी जाहीर केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. त्यात, आज शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 68 उमेदवारी अर्ज दाखल आहेत. मात्र, काँग्रेसच्या उमेदवारीवरुन पार्थ पवार यांनी संताप व्यक्त केलाय. विशेष म्हणजे, काँग्रेसचा (Congress) महाराष्ट्रात डाऊनफॉल म्हणत त्यांनी काँग्रेसला इशाराही दिलाय. त्यावर, शरद पवारांनी (Sharad pawar) प्रतिक्रिया दिलीय.

महाविकास आघाडीतील दोन पक्षांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्यानंतरही काँग्रेसने आकाश मोरे यांना येथून उमेदवारी दिली. आकाश मोरे यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केल्यानंतर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही सुनेत्रा पवारांनी फोन केला होता. मात्र, काँग्रेसने उमेदवार दिल्याने महायुतीमधील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, पार्थ पवार यांनी थेट काँग्रेसला इशाराच दिलाय. पार्थ पवार यांच्या या वक्तव्यावर आता शरद पवारांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.

शरद पवार यांनी आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली, त्यानंतर दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयावर भूमिका स्पष्ट केली. अशोक खरातपासून ते बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केलं.

पार्थ पवारांच्या प्रश्नावर स्मीतहास्य (Sharad pawar on parth)

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरुन पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेसंदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. शरद पवारांनी स्मीतहास्य करत या प्रश्नावर उत्तर दिले. ”राजकारणात एक प्रकारची परिपक्वता लागते. ती पार्थ पवार यांच्यात कितपत आहे, हे आज मी सांगू शकत नाही”, असे म्हणत एकप्रकारे शरद पवारांनी पार्थ यांचे कान टोचले आहेत.

लोकप्रतिनिधी बाबांकडे जातात ही चिंताजनक आहे (अशोक खरात शरद पवार)

सध्या राज्यात सुरू असलेल्या अशोक खरात प्रकरणासंदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, मी 2-3 ठिकाणी जातो, पंढरपूरला पांडुरंग, तुळजापूरला तुळजाभवानीचं दर्शन घेतो. तसेच, निवडणुकीवेळी कान्हेरी गावात मारुतीचं दर्शन घेतो, पण त्याची जाहिरात करत नाही. आज राज्यात चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. खरात बाबानंतर आणखी बाबा आला, राज्यात बाबांची गर्दी झाली आहे. एका बाजूला शाहू-फुले-आंबेडकर म्हणायचं आणि दुसरीकडे अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी जातात हे चिंताजनक आहेत. कोणी किती फोन केले? हे माझ्या वाचनात आलं, त्यात अनेकांची नावं आहेत, त्यात राजकीय पक्षात स्थान भूषवणारे लोकही आहेत, असे म्हणत शरद पवारांनी नाव न घेता सीडीआरमधून समोर आलेल्या माहितीचा उल्लेख आपल्या पत्रकार परिषदेत केला.

विलिनीकरणाच्या भविष्यातील चर्चेवत आता सांगता येणार नाही – पवार (Sharad pawar NCP)

आमच्या वतीने विलिनीकरणाची चर्चा जयंत पाटील करत होते, अजित पवार यांच्यासोबत ती चर्चा सुरू होती. आमच्या पक्षात ती चर्चा आता झाली नाही. याबाबत जयंत पाटील मला ब्रिफिंग करत होते, भविष्यात चर्चा होईल का? याबाबत आज सांगता येणार नाही. आता आपण पक्षाचं काम करत राहाव असं मला वाटतं, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी विलिनीकरणाच्या प्रश्नावर दिली.

हेही वाचा

अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय

आणखी वाचा

Comments are closed.