MI नाही, RCB ही नाही! दिग्गज खेळाडूने IPL 2026च्या फायनलमध्ये खेळणाऱ्या पहिल्या टीमचं नाव सांगू

IPL 2026 अंतिम अंदाज: आयपीएल 2026 मध्ये आज डबल हेडर रंगणार आहे. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने येतील, तर संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. स्पर्धेतील सर्व 10 संघांनी किमान 3 सामने खेळले असल्याने आता प्रत्येक संघाचे बलस्थान आणि कमकुवत बाजू स्पष्ट दिसू लागल्या आहेत.

लखनऊ सुपर जायंट्सच्या मुकुल चौधरीने मागील सामन्यात हरलेली बाजी जिंकून दिली, तर राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करताना दिसतोय. मागील सामना वगळता रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही प्रभावी राहिली आहे. मात्र सर्वाधिक किताब जिंकलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा सुरुवात अपेक्षेप्रमाणे झालेली नाही.

दरम्यान, श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याने मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले की, “यंदा राजस्थान रॉयल्स नक्कीच आयपीएल फायनलमध्ये पोहोचेल.” यावरून राजस्थानची सध्याची कामगिरी किती भेदक आहे, याची कल्पना येते. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांची सलामी जोडी मोठमोठ्या गोलंदाजांवर आक्रमण करत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांनी 11 षटकांत 150 धावा केल्या, तर आरसीबीविरुद्ध 202 धावांचे लक्ष्य 12 चेंडू राखून पार केले.

राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2026 मधील सुरुवातीचे 4 सामने जिंकले आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त फक्त पंजाब किंग्स हा एकमेव संघ आहे, ज्याने अजून एकही सामना गमावलेला नाही. पंजाबने 3 पैकी 2 सामने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.

राजस्थानला दुसऱ्या किताबाची प्रतीक्षा

आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली होती. राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली पहिला हंगाम जिंकला होता. त्यानंतर संघ फक्त एकदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये राजस्थान फायनलमध्ये पोहोचला, मात्र त्यांना गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला.

हे ही वाचा –

Yuzvendra Chahal Controversy : युझी हे काय केलं? चहलच्या त्या एका घाणेरड्या सवयीमुळे टीम इंडियाची प्रतिमा डागाळली, रोडवर मध्यरात्री नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.