भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवट; राज ठाकरेंनी मोजक्याच शब्दात सांगितली द लिजेंड आशाताईंची उंची

मुंबई : पद्मविभूषण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले, वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील श्रद्धांजली वाहत आशाताईंच्या कार्यकर्तृत्वावर भाष्य केलंय. कला, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आशाताईंना श्रद्धांजली वाहिली. त्यामध्ये, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्यातील कलावंत आणि आशा भोसले यांच्यासोबत असलेल्या जवळीकतेचे पदर आपल्या प्रतिक्रियेतून उलगडले आहेत. आशाताईंचं जाणं म्हणजे भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला, से राज यांनी म्हटले.

ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात. लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातलं परफेक्शन, कमालीचा आखीवरेखीवपणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं, असे म्हणत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आशाताईंच्या संघर्षमय जीवनगाथा सांगत त्यांनी कर्तृत्वातून कमावलेली उंचीही आपल्या शब्दातून व्यक्त केलीय.

‘गाणं हे माझं पॅशन आहे’ किंवा ‘ऍक्टिंग माझं पॅशन आहे’ असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात. असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या 15 व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण, या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली. मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत.

गाण्यातील विविधांगी रुपं

‘पिया तू अब तो आजा’ मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. ‘आईये मेहरबान’ मध्ये लडिवाळपणा आहे, ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए’ मध्ये नजाकत आहे. ‘दम मारो दम’ मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ म्हणत युगायुगांचं वैराग्याचे प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात, असे म्हणत राज ठाकरेंनी आशाताईंच्या गाण्यातील विविधांगी रुप दाखवून दिलंय.

आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या

व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या. जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील.

रेनेसाँस युगाचा शेवट

जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या  रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला, अशी युगवैश्विक प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी आपल्या भरीव आणि भावनिक शब्दातून व्यक्त केलीय. राज ठाकरे यांच्यासाठी लता दीदी आणि आशा ताई नेहमीच भावनिक बंध राहिला आहे. त्यामुळेच, आशाताईंच्या निधनानंतर राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत आशाताईंचं वर्णन करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

हेही वाचा

पद्मविभूषण ते महाराष्ट्र भूषण… सूरसम्राज्ञी आशाताईंचा देशपातळीवर अनेक पुरस्कारांनी गौरव; सिनेक्षेत्रातही दबदबा

आणखी वाचा

Comments are closed.