सम्राट चौधरी बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत.
विधीमंडळ नेतेपदी, नितीश कुमार यांचा पदत्याग
वृत्तसंस्था / पाटणा
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री होणार, हे आता निश्चित झाले आहे. मंगळवारी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी एकमुखाने निवड करण्यात आली आहे. तत्पूर्वी मावळते मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पदत्याग केला. सम्राट चौधरी हे आज बुधवारी शपथग्रहण करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
बिहारची राजधानी पाटणा येथे मंगळवारी दुपारी भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ शाखेची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सम्राट चौधरी यांचे विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून नाव सुचविण्यात आले. त्यांच्या नावाची सूचना विद्यमान उपमुख्यमंत्री विजय सिन्हा, तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते मंगल पांडे, दिलीप जयस्वाल आणि रेणू देवी यांनी केली. सर्व उपस्थित सदस्यांनी त्यांच्या या सूचनेला समर्थन दिल्याने रीतसर त्यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
नितीश कुमार यांचे त्यागपत्र
मंगळवारी सकाळी मावळते मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या मंत्रिमंडळाची अखेरची बैठक आयाजित केली होती. या बैठकीत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत असल्याची औपचारिक घोषणा केली. तसेच मंत्रीमंडळाचे विसर्जन करण्याची सूचना राज्यपालांना करणार असल्याचीही घोषणा केली. या घोषणांना मंत्रीमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर त्यांनी राज्यपाल सय्यद अता हुसेन यांची राजभवनात भेट घेऊन त्यांना आपले त्यागपत्र सादर केले. ते त्वरित स्वीकारण्यात आले आहे.
दोन दशकांच्या युगाचा अंत
मावळते मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर ते मुख्यमंत्रीपद सोडणार, हे निश्चित झाले होते. 10 एप्रिलला त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथग्रहण केले. 14 एप्रिलला आपण मुख्यमंत्रीपदाचा त्याग करु अशी घोषणा त्यांनी त्याचवेळी केली होती. त्यानुसार त्यांनी मंगळवारी आपल्या पदाचा त्याग केला. त्यांच्या पदत्यागामुळे जवळपास 21 वर्षांपासून चालत असलेल्या बिहारमधील देदिप्यमान राजकीय युगाचा अंत झाला आहे. या घटनेनंतर आता बिहारमध्ये नव्या नेत्याच्या नेतृत्वात नव्या व्यवस्थेचा उदय होत आहे.
प्रभावशाली मागसवर्गीय नेते
सम्राट चौधरी हे कोयरी कुशवाह समाजाचे असून हा समाज बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये राजकीयदृष्ट्या प्रभावशाली आहे. सम्राट चौधरी हे भारतीय जनता पक्षाचे बिहारमधील सर्वात प्रभावी मागासवर्गीय नेते म्हणून ओळखले जातात. मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या बिहार शाखेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी राज्यात पक्षाचा तळागाळात विस्तार करण्यामध्ये अत्यंत महत्वाचे योगदान दिलेले आहे.
सम्राट चौधरी यांचा अल्पपरिचय
जन्म : 16 नोव्हेंबर 1968 (बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात लाखनपूर या ग्रामी)
कौटुंबिक पार्श्वभूमी : पिता शकुनी चौधरी हे सहा वेळा आमदार आणि एकदा खासदार, माता पार्वती देवी याही एकदा आमदार.
शिक्षण : प्राथमिक शिक्षणानंतर मदुराई कामराज विद्यापीठात उच्च शिक्षण
राजकीय पार्श्वभूमी : 1990 मध्ये राजकारणात प्रवेश. 1999 मध्ये बिहारच्या राबडीदेवी सरकारमध्ये मंत्री म्हणून समावेश. राजकारणाचा प्रारंभ राष्ट्रीय जनता दल या पक्षातून. काही काळ संयुक्त जनता दलाचेही सदस्य. 2017 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री
सांभाळलेले विभाग : कृषी, पंचायती राज, शहर विकास, गृहनिर्माण, गृह
बिहार भाजप अध्यक्ष : 2023 मध्ये बिहार भारतीय जनता पक्ष शाखाध्यक्ष
Comments are closed.