OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला, संशयिताला अटक
OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांच्या घरावर गेल्या आठवड्यात ‘मोलोटोव्ह कॉकटेल’ हल्ला करणाऱ्या संशयिताला सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी अटक केली आहे. डॅनियल मोरेनो-गामा असे या २० वर्षीय संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत – एक सॅम ऑल्टमॅन यांच्याशी संबंधित आणि दुसरा ऑल्टमॅन यांच्या घरावरील सुरक्षा रक्षकाशी संबंधित असल्याचे ‘फोर्ब्स’च्या वृत्तात म्हटले आहे.
सॅन फ्रान्सिस्को पोलीस विभागाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे,’ तसेच ‘सध्या आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे.’ ही अटक झाली असली तरी, या प्रकरणाचा तपास अजूनही सक्रियपणे सुरू असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
सॅम ऑल्टमॅन यांच्या घरावर गेल्या आठवड्यात ४८ तासांपेक्षा कमी कालावधीत दोनदा हल्ले झाले. या प्रकरणात पोलिसांनी इतर दोन संशयितांनाही अटक केली आहे, ज्यांच्यावर सॅन फ्रान्सिस्कोच्या रशियन हिल परिसरातून गाडी चालवताना गोळीबार केल्याचा आरोप आहे.
डॅनियल मोरेनो-गामा याच्यावर विनापरवाना शस्त्र बाळगणे आणि स्फोटकांच्या साहाय्याने मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप आहे. ‘फोर्ब्स’च्या वृत्तानुसार, त्याच्यावर जाळपोळीचा प्रयत्न आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संशयिताकडे आढळली ‘एआय-विरोधी’ यादी
‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार, अटकेच्या वेळी डॅनियल मोरेनो-गामाकडे एक ‘एआय-विरोधी’ कागद सापडला आहे, ज्यामध्ये विविध एआय कंपन्यांच्या सीईओंची यादी होती.
Comments are closed.