अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल NADAच्या रडारवर, नियमांचे तीनदा उल्लंघन केल्यास…
आयपीएल २०२६ च्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे. आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांचा राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या (नाडा) नोंदणीकृत चाचणी गटात (आरटीपी) समावेश करण्यात आला आहे. आरटीपीमध्ये समाविष्ट असलेल्या ३४८ खेळाडूंच्या ताज्या यादीत अभिषेक आणि अक्षर यांनी स्मृती मंधाना आणि श्रेयस अय्यर यांची जागा घेतली आहे.
सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२६ मध्ये अक्षर दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत असून अभिषेक सनरायझर्स हैद्राबादचा उपकर्णधार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि अक्षर यांचा नाडाच्या ताज्या यादीत समावेश करण्यात आला, याचा अर्थ या भारतीय खेळाडूंवर अधिक कठोर नियम आणि मोठी जबाबदारी येणार आहे.
या यादीत असलेल्या खेळाडूंना उत्तेजक विरोधी संस्थेला त्यांच्या वास्तव्याची माहिती द्यावी लागेल आणि दररोज एका विशिष्ट वेळी टेस्टसाठी उपलब्ध राहावे लागेल. जर एखादा खेळाडू तीन वेळा आपल्या ठिकाणाची माहिती देण्यास अपयशी ठरला, तर ते उत्तेजक द्रव्य सेवनाचे उल्लंघन मानले जाते, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीत गंभीर अडचणी येऊ शकतात.
भारताच्या टी२० संघाचा प्रमुख खेळाडू अभिषेक टी२० विश्वचषकानंतर आयपीएल २०२६ मध्येही खराब फॉर्ममधून जात आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यात १२९ धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट मात्र उत्तम असा २१५.०० असा आहे. दुसरीकडे अक्षर दिल्लीचे सलग दुसऱ्यांदा नेतृत्व करत आहे. संघाने खेळलेल्या ४ सामन्यांत २ विजय आणि २ पराभव मिळवले आहेत. यामध्ये अक्षरतने केवळ ३ विकेट्स घेतल्या आहेत.
महिला क्रिकेटपटूंमध्ये दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा आणि रेणुका सिंग ठाकुर अजूनही नाडाचा भाग आहेत. तसेच शुबमन गिल. यशस्वी जायस्वाल, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, केएल राहुल, अर्शदीप सिंग आणि तिलक वर्मा यांचाही नाडाच्या चाचणी गटात समावेश आहे. तसेच या यादीत सर्वाधिक खेळाडू ऍथलेटिक्समधील आहेत.
स्टीपलचेस अविनाश साबळे, अडथळा शर्यतीतीत धावपटू ज्योती याराजी, डेकॅथलॉनपटू तेजस्विन शंकर आणि धावपटू अनिमेश कुजूर या ऍथलेटिक्सचा समावेश आहे. तसेच लांब उडीपटू शैला सिंग आणि एम शंकर, गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूर यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
Comments are closed.