IPL 2026: पहिल्या 4 सामन्यांत फक्त 1 विकेट, मग अचानक कसं पालटलं नूर अहमदचं नशीब? प्रशिक्षकांनी केला खुलासा

आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सची (CSK) सुरुवात अत्यंत खराब झाली होती. पहिल्या तीन सामन्यांत सलग पराभव पत्करावा लागल्यानंतर, आता संघाने सलग दोन सामने जिंकून पुन्हा एकदा विजयाची लय पकडली आहे. चेन्नईने आपला शेवटचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) खेळला, ज्यामध्ये त्यांनी 32 धावांनी विजय मिळवला. चेन्नईच्या या विजयात अफगाणिस्तानचा फिरकीपटू नूर अहमद (Noor Ahmed) याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. त्याने केकेआरविरुद्ध तीन विकेट्स घेत आपला फॉर्म सिद्ध केला आणि चेन्नईला सोपा विजय मिळवून दिला.

नूरच्या या कामगिरीबद्दल बोलताना चेन्नईचे सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम यांनी सांगितले की, धोनीच्या सल्ल्यामुळे सर्व काही बदलले. श्रीराम म्हणाले, माझ्या मते ही खेळपट्टी गोलंदाजीसाठी योग्य होती. नूरचा चेंडू हवेत खूप संथ (slow) होता आणि तो चांगला टर्न होत होता. धोनीने नेट्समध्ये नूरला चेंडू हवेत थोडा संथ टाकण्यास आणि त्याला थोडा वेळ देण्यास सांगितले होते. दोघांमध्ये झालेल्या या चर्चेमुळे नूरला त्याची ‘लेग ब्रेक’ पुन्हा मिळवता आली, ज्याचा त्याला सामन्यात खूप फायदा झाला.

गोलंदाजी प्रशिक्षकांनी यावेळी अकील हुसेन आणि नूर अहमद यांच्या जोडीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, हे दोन्ही खेळाडू एकमेकांना उत्तम साथ देत आहेत. त्यांच्यात चांगला संवाद आणि समज आहे. केकेआरविरुद्धच्या सामन्यात अकीलनेच नूरला योग्य ‘लेंथ’ सांगितली, ज्यामुळे फलंदाजांना त्याला खेळणे कठीण झाले.

नूर अहमदची कामगिरी पाहता, गेल्या चार सामन्यांत त्याला केवळ एकच विकेट मिळाली होती. मात्र, चेपॉक मैदानावर त्याने 21 धावा देत 3 गडी बाद केले. चेन्नईने दिलेल्या 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा संघ 7 बाद 160 धावाच करू शकला. या विजयासह चेन्नईने पाच सामन्यांत दुसरा विजय नोंदवला असून, संघ आता गुणतालिकेत (Points Table) 10 व्या स्थानावरून 8 व्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नईचे खेळाडू आगामी सामन्यांतही हाच फॉर्म कायम राखतील, अशी चाहत्यांना आशा आहे.

Comments are closed.