IPL 2026 – मुंबई इंडियन्सच्या अडचणींचे सत्र सुरूच: रोहित शर्मा दुखापतीमुळे दोन सामन्यांतून बाहेर?
IPL 2026 मध्ये पराभवाची हॅट्रीक करत अडचणीत सापडलेल्या मुंबई इंडियन्सच्या अडचणीत आता मोठी भर पडली आहे. संघाचा स्टार सलामीवीर आणि माजी कर्णधार रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे पुढील दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करत असताना रोहितला ही दुखापत झाली आणि त्याला ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन मैदान सोडावे लागले. या दुखापतीचा फटका संघाला बसला असून हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईला त्या सामन्यात 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
रोहित शर्मा सध्या फॉर्मात असून त्याने चार सामन्यांत 137 धावा केल्या आहेत. NDTV ने दिलेल्या वृत्तानुसार, 16 एप्रिलला पंजाब किंग्स आणि 20 एप्रिलला गुजरात टायटन्सविरुद्ध होणाऱ्या महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये तो खेळण्याची शक्यता कमी असल्याने मुंबईच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुंबईने यंदाच्या हंगामाची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवून दणक्यात केली होती, मात्र त्यानंतर सलग तीन सामने गमावल्यामुळे संघाची मोहीम रुळावरून घसरली आहे.
IPL 2026 – चूक झाल्याचे मान्य करा अन् ‘त्या’ खेळाडूला बाकावर बसवा, वीरेंद्र सेहवागने KKR ला झापलं
दुसरीकडे, फलंदाजीसोबतच मुंबईची गोलंदाजीही कमकुवत दुवा ठरत आहे. विशेषतः स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या हंगामातील चार सामन्यांत अद्याप एकही बळी मिळवू शकलेला नाही, ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पंड्या असूनही मुंबईला सुरुवातीच्या षटकांत यश मिळत नसल्याने पॉवरप्लेमधील कामगिरी सुधारण्याचे मोठे आव्हान संघासमोर आहे. रोहितच्या अनुपस्थितीत आता मुंबईला विजयासाठी सांघिक कामगिरीवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागणार आहे.
Comments are closed.