Ratnagiri News – आंबा बागायतीत क्रांती! ‘पिशवी पद्धत’ प्रयोग ठरतोय शेतकऱ्यांसाठी वरदान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आंबा बागायतीसाठी राबविलेला ‘पिशवी पद्धत’ हा नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी ठरत असून, शेतकऱ्यांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बदलत्या हवामानामुळे आंब्यावर होणारे डाग, कीड-रोग आणि फळगळ यावर हा प्रयोग प्रभावी उपाय ठरत आहे. विशेष म्हणजे, या पद्धतीमुळे फळांच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होत असून बाजारात अधिक दर मिळण्यास मदत होत आहे.

विद्यापीठाच्या असोंड प्रक्षेत्रात सुमारे ८० हेक्टर क्षेत्रावर ५ हजार आंबा झाडांवर हा प्रयोग राबविण्यात आला आहे. दहा फूट उंचीपर्यंत वाढलेल्या झाडांवरील फळांना २५x२० सें.मी. आकाराच्या विशेष पिशव्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे फळांचा रंग, आकार आणि वजन सुधारत असून कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी होत आहे. परिणामी, आकर्षक व दर्जेदार आंब्यांना बाजारात चांगला भाव मिळत आहे.

या प्रयोगामुळे शेतकऱ्यांचा आधुनिक तंत्रज्ञानाकडे कल वाढत असून ‘स्मार्ट शेती’च्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. असोंड प्रक्षेत्रात आयोजित पत्रकार अभ्यास दौऱ्यात या पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी प्रक्षेत्र संचालक डॉ. अरुण माने, डॉ. योगेश परुळेकर, डॉ. संदीप महाडिक, डॉ. जे. डी. देसाई, डॉ. संतोष वरवडेकर आणि उदय चव्हाण उपस्थित होते.

Comments are closed.