Sunstroke Remedies : उष्माघाताच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी प्यावे या बियांचे पाणी

मागील काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यभरात तीव्र उन्हाच्या चटक्यांचा सामना करावा लागत आहे. डोक्यावर तळपता सूर्य, शरीरातून वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि घशाला सतत पडणारी कोरड या सगळ्यामुळे जीव अगदी नकोसा झाला आहे. अशा उष्णतेत अनेकांना भोवळ येते आणि उष्माघाताचा झटका येतो. काहीवेळा उष्माघातामुळे जीवही जाऊ शकतो. त्यामुळे अशा समस्या टाळण्यासाठी सब्जा हा रामबाण उपाय आहे. आज आपण सब्जाच्या बियांचे फायदे आणि सेवन करण्याची पद्धत जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात सब्जाच्या बियांच्या पाण्याचे सेवन करणे शरीरासाठी लाभदायक असते. सब्जा हा थंड असल्याने शरीरातील उष्णतेचे प्रमाण कमी करतो, त्यामुळे या बिया तुम्ही पाणी, सरबत किंवा मिल्कशेकमध्ये टाकून पिऊ शकता. सब्जाच्या बियांमध्ये फायबर अधिक प्रमाण असते, जे पोटाचे आरोग्य उत्तम ठेवते. यासह यात प्रोटीन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, हेल्दी फॅट आणि कार्बोहायड्रेट्स देखील असतात.

फायदे

शरीर थंड राहते

सब्जा थंडावा देणारा पदार्थ आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी तुम्ही या बियांचा वापर सरबत किंवा पाण्यात करायला हवा.

वेट लॉससाठी उपयुक्त

सब्जाच्या बिया अल्फा-लिनेलेनिक अॅसिडने समृद्ध असतात. या अॅसिडमुळे शरीरातील चरबीचे चयापचय वाढण्यास मदत होते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे अनावश्यक भूक लागत नाही. परिणामी वजन नियंत्रणात राहते. वेट लॉससाठी या बिया तुम्ही दही किंवा फ्रुट सलाड मध्ये टाकून खाऊ शकता.

बद्धकोष्ठतेवर गुणकारी

सब्जा शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करते. त्यामुळे झोपण्यापूर्वी ग्लासभर दुधासोबत काही सब्जाच्या बिया खाल्ल्यास पोट साफ होण्यास मदत होते.

अॅसिडिटीपासून मुक्तता

सब्जा पोटातील जळजळ कमी करतात आणि शरिरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकतात. तसेच शरिरातील एचसीएलचा आम्ल प्रभाव नाहीसा करुन आराम देतात. परिणामी अॅसिडिटीचा त्रास होत नाही.

सब्जा बियांचे पाणी कसे बनवाल?

ग्लासभर पाण्यात चमचाभर बिया टाका. यानंतर 10 मिनिटे त्यात भिजत ठेवा. 10 मिनिटांनंतर त्या जेलीसारख्या फुगलेल्या तुम्हाला दिसतील. हे पाणी तुम्ही नुसते किंवा सरबत, मिल्कशेकमध्ये टाकून पिऊ शकता.

हेही वाचा – Ice Gola : थंडगार बर्फाचा गोळा भर उन्हात खाताय?

Comments are closed.