रोहित शर्मा पंजाबविरुद्ध खेळणार नाही, मग एमआयसाठी कोण येणार ओपनिंगला? 'हे' तीन पर्याय उपलब्ध
आयपीएल २०२६ मध्ये पाच वेळेचा विजेता मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यातील केवळ एकच सामना जिंकला आहे. त्यामुळे तीन पराभव आणि एक विजयासह मुंबई गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. त्यातच संघाची डोकेदुखी आणखी वाढली, स्टार फलंदाज रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे.
मुंबई इंडियन्स आज (१६ एप्रिल) घरच्या मैदानावर पंजाब किंग्जशी दोन हात करणार आहे. रोहित याच सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. त्याला मागील सामन्यात म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. यामुळे तो फलंदाजीवेळी रिटायर-हर्ट होऊन परतला. तसेच त्याने पंजाबविरुद्धच्या सामन्याआधी सरावही केला नाही. त्याचे स्कॅन झाले असता दुखापत गंभीर दिसत नसली, तरी संघ व्यवस्थापक त्याच्याबाबतीत जोखीम घेण्याची शक्यता फारच कमी आहे.
रोहितच्या अनुपस्थितीमुळे डावाची सुरूवात कोण करणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पंजाबविरुद्ध मुंबईसाठी सलामीला फलंदाजीसाठी संघाकडे तीन पर्याय आहेत. त्यातील पहिला पर्याय क्विंटन डी कॉक. रोहितच्या जागी क्विंटनला घेतले तर संघाला शेर्फेन रदरफोर्ड, मिचेल सॅंटनर आणि ट्रेंट बोल्ट यांच्यापैकी एका परदेशी खेळाडूला वगळावे लागले. हा मोठा बदल संघाला फायदेशीर ठरेल का? सॅंटनर आणि बोल्ट यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. डी कॉकचीही मागील कामगिरी उत्तम राहिली असून त्याला संघात घेतले तर एका भारतीय गोलंदाजाला संधी द्यावी लागणार आहे.
दुसरा पर्याय दानिश मालेवार. विदर्भाचा दानिश रोहितची जागा घेऊ शकतो. त्याच्यामुळे संघाला अंतिम अकरामध्ये अधिक बदलही करावे लागणार नाहीत. त्याने प्रथम श्रेणीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसेच तो गेल्या हंगामात विदर्भ प्रो टी२० लीगमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर फलंदाजी करताना प्रभावी कामगिरी केली आहे. त्यातील एका सामन्यात तर त्याने ५५ चेंडूत नाबाद १२० धावा केल्या होत्या. तसेच त्या हंगामातील सहा सामन्यात ३१८ धावा केल्या होत्या.
तिसरा पर्याय रॉबिन मिन्झ. रॉबिनने गेल्या हंगामात मुंबईसाठी दोन सामने खेळले आहेत. त्याने केवळ सहा धावा केल्या होत्या, मात्र त्याला सलामीवीर म्हणून संधी मिळाली तर तो पॉवरप्ले षटकांमध्ये चांगली फटकेबाजी करू शकतो. २० टी२० सामन्यांनंतर त्याचा स्ट्राईक रेट १५५.१९ असून त्याने एका अर्धशतकासह २३९ धावा केल्या आहेत.
मुंबई नमन धीरला रायन रिकल्टनसोबत सलामीला पाठवण्याचीही शक्यता आहे. त्याने मागील हंगामात एका सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. तसेच त्याने २०२५ च्या हंगामात पंजाबविरुद्ध १८ चेंडूत ३७ धावा केल्या होत्या. विल जॅक्सही लवकरच संघाशी जोडला जाणार असून तो सलामीसाठी एक उत्तम पर्याय आहे, मात्र पंजाबच्या सामन्यासाठी तो उपलब्ध असण्याची शक्यता फारच कमी आहे.
Comments are closed.