IPL 2026 – दिल्लीचा मयांक रावत मुंबई गाजवण्यासाठी सज्ज, PBKS विरुद्ध पदार्पणाची संधी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स संघात वानखेडे मैदानावर सामना होत आहे. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या लढतीत मुंबईने 2 बदल केले आहे. दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू मयांक रावत याला संघात स्थान दिले आहे. तसेच जायबंदी रोहित शर्मा याच्या जागी डावखुरा फलंदाज क्विंटन डी कॉक याला संधी देण्यात आली आहे.
मयांक रावत या अष्टपैलू खेळाडूवर मुंबईने 30 लाख रुपयांच्या आधारभूत किमतीत बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. मयांकची क्रिकेट कारकीर्द ही एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी आहे. 2011 पासून प्रशिक्षक राजेश नगर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या मयांकने ज्युनिअर क्रिकेटमध्येच आपल्या बॅटचा तडाखा दाखवला होता. अंडर-14 स्तरावर हरियाणाविरुद्ध 220 धावांची खेळी आणि त्यानंतर 244 धावांची तुफानी खेळी करून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
संघर्ष आणि पुनरागमन
सुरुवातीच्या काळात मोठी धावसंख्या उभारूनही मयांकला दिल्लीच्या संघात म्हणावे तसे स्थान मिळाले नाही. अनेक वर्षे तो निवडीच्या प्रतीक्षेत होता आणि त्याची कामगिरीही खालावली होती. मात्र, हार न मानता त्याने आपल्या खेळावर काम सुरू ठेवले. मयांकसाठी खरी संधी ‘दिल्ली प्रीमियर लीग’मधून चालून आली. या स्पर्धेत त्याने आपल्या अष्टपैलू खेळाने आणि अफाट मेहनतीने मुंबई इंडियन्सच्या स्काउट्सना प्रभावित केले.
मुंबई इंडियन्सचा नवा ‘फिनिशर’?
हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांसारख्या खेळाडूंना घडवणारी मुंबई इंडियन्सची ‘नर्सरी’ आता मयांक रावतला पैलू पाडण्यासाठी सज्ज आहे. कमी किमतीत मिळालेला हा खेळाडू भविष्यात मुंबईसाठी मोठी गुंतवणूक ठरू शकतो. फटकेबाजीसोबतच उपयुक्त गोलंदाजीची क्षमता त्याला खास बनवते.
Comments are closed.