विधान परिषदेची 12 मे रोजी निवडणूक, 10 जागांसाठी होणार मतदान
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यायच्या नियमित 9 आणि सदस्यत्वाच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या 1 अशा दहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला. यानुसार महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 12 मे रोजी निवडणूक होणार आहे.
विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून देण्यात आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राजेश राठोड (कॉँग्रेस) यांच्यासह भाजपचे संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे, रणजितसिंह मोहिते-पाटील, शिंदे गटाच्या नीलम गोऱहे, अजित पवार गटाचे अमोल मिटकरी या नऊ सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपत आहेत. तर प्रज्ञा सातव यांनी सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने एक जागा रिक्त झाली आहे. या दहा जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला.
महायुतीला 8 तर महाविकास आघाडीला 1 जागा
विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता सत्ताधारी नियमित 9 जागांपैकी महायुतीला 8 तर माविआला 1 जागा या निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे. महायुतीत भाजपच्या वाटय़ाला 4, शिंदे व अजित पवार गट प्रत्येकी 2 तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा मिळून 1 उमेदवार विधान परिषदेवर निवडून जाईल. भाजपकडून प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
Comments are closed.