कॅच ऑफ द सीझन…श्रेयस अय्यरच्या झेलने मुंबईचा डगआऊट स्तब्ध, रोहितने तोंडात बोटं टाकली, VIDEO
श्रेयस अय्यर कॅच एमआय वि पीबीकेएस आयपीएल २०२६: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स (Mumbai Indians vs Punjab Kings) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर 7 विकेट्सने विजय मिळवला. मुंबई इंडियन्सचा हा सलग चौथा पराभव ठरला. तर पंजाब किंग्सने 5 सामन्यात चार विजय मिळवले. एक सामना अनिर्णित राहिला. सध्या 9 गुणांसह पंजाबचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या झेलने सगळ्यांचं लक्ष वेधलं. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने आयपीएल 2026 च्या हंगामातील सर्वोत्तम झेल घेतला. मार्को जॅन्सनच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्याने चेंडू सीमारेषेजवळ टोलावला. यावेळी क्षेत्ररक्षण करत असलेल्या श्रेयस अय्यरने अविश्वसनीय कॅच पकडली.
श्रेयस अय्यरच्या झेलने मुंबईचे डगआऊट थक्क केले, VIDEO: (श्रेयस अय्यरने पकडला MI vs PBKS IPL 2026)
षटकारासाठी जाणारा चेंडू हवेत उंच उडी मारत श्रेयस अय्यरने टिपला. यावेळी श्रेयस अय्यरचं शरीर बाऊंड्री लाईनच्या वर हवेत बाहेर होतं. श्रेयस बाऊंड्री लाईनच्या बाहेर जाणार इतक्यात त्याने समोर उभा असणाऱ्या झेवियर बार्टलेटच्या दिशेने चेंडू फेकला आणि झेल पूर्ण केला. श्रेयस अय्यरच्या या झेलमुळे मागेच बसलेलं मुंबई इंडियन्सचं संपूर्ण डगआऊट स्तब्ध झालं. तसेच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा एकमेकांना पाहत बसले. श्रेयस अय्यरच्या हा झेल पाहून रोहित शर्माने तर तोंडात बोटं टाकली. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भेट कशी झाली? (MI vs PBKS IPL 2026)
मुंबईला 20 षटकांत 6 बाद 195 धावांवर रोखल्यानंतर पंजाबने 16.3 षटकांमध्येच 3 बाद 198 धावा फटकावल्या, मुंबईचा हा सलग चौथा पराभव ठरला, तर पंजाबने चौथ्या विजयासह सर्वाधिक 9 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. अचूक मारा करणारा अर्शदीप सिंग सामनावीर ठरला. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबला कोणतीही अडचण आली नाही. अल्लाह घझनफर याने प्रियांश आर्य आणि कूपर कॉनोली यांना स्वस्तात बाद केले. परंतु, प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 67 चेंडूंत 139 धावांची भागीदारी करत पंजाबचा विजय स्पष्ट केला, प्रभसिमरनने 23 चेंडूंत, अय्यरने 31 चेंडूंत अर्धशतक झळकावले.
काय म्हणाला हार्दिक पांड्या? (हार्दिक पांड्या आयपीएल 2026)
अगदी खरे सांगायचे तर, सध्या माझ्याकडे बोलण्यासारखे फारसे काही नाही. मला वाटते की, आम्हाला पुन्हा एकदा नव्याने विचारमंथन करणे आणि नक्की कुठे उणीव भासत आहे, हे शोधून काढणे अत्यंत गरजेचे आहे. ही उणीव वैयक्तिक पातळीवर आहे की सांघिक पातळीवर आहे? की नियोजनामध्ये काही कमतरता आहे? आपण नक्कीच याचा छडा लावू आणि त्यानंतर पुढे काय करता येईल, याचा विचार करू, असं हार्दिक पांड्या पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर म्हणाला.
Comments are closed.