केकेआरचा पराभव सुरूच आहे
गुजरात टायटन्स 5 गड्यांनी विजयी : शुभमन गिलची 86 धावांची मॅचविनिंग खेळी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरात टायटन्सविरुद्ध शुक्रवारी झालेल्या सामन्यात केकेआरला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात केकेआरचा संघ 180 धावांत ऑलआऊट झाला. यानंतर विजयी लक्ष्य गुजरातने 19.4 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह गुणतालिकेत गुजरातचा संघ चौथ्या स्थानी पोहोचला आहे तर पाच पराभवासह केकेआरचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. पराभवामुळे त्यांचे स्पर्धेतील स्थानही धोक्यात आले आहे.
केकेआरने हा सामना जिंकण्यासाठी गुजरातला 181 धावांचे टार्गेट दिले होते. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या साई सुदर्शन आणि शुभमन गिलने पहिल्या विकेटसाठी 57 धावा चोपल्या. साई सुदर्शन 22 धावा करून माघारी परतला. पण त्यानंतर शुभमन गिलने जोस बटलरसोबत मिळून डाव सावरला. ही जोडी जमलेली असतानाच जोस बटलर 25 धावा करून माघारी परतला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरही अपयशी ठरला. त्याला केवळ 13 धावा करता आल्या.
शुभमन गिलचे शतक हुकले
यानंतर गिलकडे शतक झळकावण्याची संधी होती. पण त्याचे शतक 14 धावांनी हुकले. शानदार खेळी साकारताना गिलने 50 चेंडूत 86 धावांचे योगदान दिले. त्याने केकेआरच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. गिल बाद झाल्यानंतर राहुल तेवतिया आणि ग्लेन फिलिप्स यांनी संघाला विजय मिळवून दिला. गुजरातने हा सामना 5 गडी राखून आपल्या नावावर केला.
केकेआरच्या पदरी पुन्हा निराशा
प्रारंभी, या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्सकडून सलामीला आलेला अजिंक्य रहाणे पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर टीम सेफर्ट 19 धावांवर बाद झाला. अंगकृष रघुवंशीने 8 धावांचे योगदान दिले. त्यालाही फार काळ मैदानावर टिकता आले नाही. कोलकाताकडून एकटा कॅमेरॉन ग्रीन खंबीरपणे उभा राहिला. त्याने रोव्हमन पॉवेलसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. ग्रीनने सर्वाधिक 55 चेंडूत 79 धावा केल्या. तर रोव्हमन पॉवेलने 27 धावा करत त्याला चांगली साथ दिली. शेवटी रमनदीप सिंगने 17 धावांचे योगदान दिले. 20 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ग्रीन 79 धावांवर बाद झाला. या जोरावर कोलकाताने 20 षटकांअखेर 180 धावा केल्या.

Comments are closed.