नरेंद्र मोदी विरुद्ध अमित शाह संघर्ष दिसला, संजय राऊतांचा घणाघात; म्हणाले, महिला आरक्षणाच्या

महिला आरक्षण विधेयकावर संजय राऊत : नारी शक्ती वंदन अधिनियम (131 वी घटनादुरुस्ती) आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांवर देशाच्या संसदेत गुरुवारी जोरदार चर्चा झाली. त्यानंतर शुक्रवारीही सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी आपापली मते मांडली. या विधेयकांवर शुक्रवारी साडेसात वाजता मतदान घेण्यात आले. एकूण 528 सदस्यांनी मतदान केले. त्यापैकी 298 सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने, तर 230 सदस्यांनी विरोधात मतदान केले. घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी दोन-तृतीयांश विशेष बहुमत आवश्यक असते. मात्र, आवश्यक बहुमत न मिळाल्यामुळे हे विधेयक नामंजूर झाले. त्यामुळे मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

संजय राऊत म्हणाले की, अमित शाहांनी मोदींना अपमानित करण्यासाठी हे विधेयक आणलं. महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू बिल लोकसभेत आणलं. त्यांचा मूळ उद्देश हा महिलांना आरक्षण देण्याचा अधिकार वगैरे काहीही नव्हता. 543 जागांवरून 850 जागा करायच्या आणि सत्तेचा अमरपट्टा बांधून सतत विजय प्राप्त करायचा, याशिवाय अमित शाह आणि त्यांच्या लोकांचा कुठलाही हेतू नव्हता.

Sanjay Raut on Womens Reservation Bill : पुरुष विरुद्ध महिला, असा संघर्ष पेटवायचा होता

बेकायदेशीरपणे विजय मिळवण्याच्या संदर्भातील हे बिल होते. यानिमित्ताने देशात उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पेटवायचा होता. पुरुष विरुद्ध महिला, असा संघर्ष पेटवायचा होता. आम्हीच एकमेव महिलांचे तारणहार, असा नरेटिव्ह त्यांना सेट करायचा होता. जर ते खरोखरच महिलांचे तारणहार असतील तर 2023 साली जे महिला आरक्षण विधेयक आम्ही सर्वांनी मंजूर केले होते, त्यातील 543 जागांमध्ये नरेंद्र मोदींनी महिलांना 33 टक्के आरक्षण द्यायला काहीही हरकत नव्हती. आमची सर्वांचीच तयारी होती. उद्धव ठाकरेंनी त्याला पाठिंबा दिला होता. पण, ते न करता भारतीय जनता पक्षातील पुरुष खासदारांच्या जागा वाचायला पाहिजे, यासाठी 850 जागा करण्याचं हे षडयंत्र होतं. ते संसदेमध्येच लोकशाही मार्गाने उधळून लावले. महिलांच्या नावावरती भोंदूगिरी भाजप करत होती, त्याचा आम्ही पर्दाफाश केला, असा हल्लाबोल त्यांनी केला.

Sanjay Raut on Womens Reservation Bill : नरेंद्र मोदी विरुद्ध अमित शाह संघर्ष दिसला

संजय राऊत पुढे म्हणाले की, या विधेयकाच्या निमित्ताने नरेंद्र मोदी विरुद्ध अमित शाह हा पक्षांतर्गत संघर्ष पाहायला मिळाला. हा संघर्ष सुरू आहे हे दबक्या आवाजात दिसत होतं ते आम्हाला लोकसभेच्या पटलावर पाहता आलं. महिला आरक्षणाचं विधेयक 2023 साली मंजूर झालेले आहे. 2023 सालीच आम्ही याबाबत आनंद व्यक्त केला. काल जो आम्ही आनंद व्यक्त केला तो लोकशाहीचं रक्षण केल्याबद्दल होता. भारतीय जनता पक्षाने या देशात अनेक भोंदू निर्माण केले. कारण ते स्वतः भोंदू आहेत, अशी टीका देखील त्यांनी केलीय.

आणखी वाचा

Vidhanparishad Election 2026 Shivsena: मोठी बातमी: विधानपरिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचा पहिला उमेदवार ठरला, दुसऱ्या जागेवर धक्कातंत्राचा वापर करणार? ही 6 नावं रेसमध्ये

आणखी वाचा

Comments are closed.