IPL 2026: दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाची अचानक एंट्री, सीएसकेविरुद्धच्या सामन्याआधी एसआरएच संघात मोठा बदल

आयपीएल २०२६ मध्ये आज (१८ एप्रिल) दोन सामने खेळले जाणार आहेत. यातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आणि दुसरा सामना सनरायझर्स हैद्राबाद (एसआरएच) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके). या सामन्यांआधी एसआरएचसाठी एक आनंदाचे वृत्त समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज संघात सामील झाला आहे.

जेराल्ड कोएत्झी याला एसआरएचने सीएसके विरुद्धच्या सामन्याआधीच संघात सामील केले आहे. त्याला डेव्हिड पेन याच्या जागी संघात घेतले आहे. एसआरएच फ्रॅंचायजीने सोशल मीडिया पोस्टद्वारे या बदलाबाबत माहिती दिली. जेराल्ड यापूर्वी दोन आयपीएल संघाकडून खेळला आहे.

जेराल्डने २०२४ मध्ये आयपीएल पदार्पण केले. त्या हंगामात त्याने मुंबई इंडियन्सकडून सामने खेळले होते. त्याने त्या हंगामात खेळलेल्या १० सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या होत्या. यामुळेच त्याला २०२५ च्या मेगा लिलावामध्ये गुजरात टायटन्सने संधी दिली. त्याला गुजरातने २.४ कोटी रुपये खर्च करत संघात घेतले होते. तेव्हा त्याला फार सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने गुजरातकडून केवळ ४ सामने खेळले आणि त्यामध्ये २ विकेट्स घेतल्या होत्या. आता तो २०२६ चा हंगामात एसआरएचकडून खेळणार असून त्याचा हा तिसरा आयपीएल संघ आहे.

आयपीएलच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सनरायझर्स हैद्राबादने (SRH) संघाने २०२६ च्या हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी डेव्हिड पेनच्या जागी जेराल्ड कोएत्झीला करारबद्ध केल आहे.

चालू हंगामात पेनने २ सामन्यात दोन विकेट्स घेतल्या होत्या, मात्र त्याला घोट्याच्या दुखातपीमुळे उर्वरित हंगामाला मुकावे लागत आहे. त्याच्याजागी घेतलेल्या कोएत्झीने आयपीएलचे एकूण १४ सामने खेळताना १५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

Comments are closed.