माझ्या आणि नीरच्या कुटुंबियांना शिव्या घातल्या, मानसिक छळ केला.., पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सुमित अंतिलचा गंभीर आरोप
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक नवल सिंग वादात सापडले आहेत. टोकियो आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या सुमित अंतिलने नवल सिंग यांच्यावर मानसिक छळ आणि अपशब्दांचा वापर केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा, नवदीप सिंग आणि संदीप चौधरी यांसारख्या दिग्गज खेळाडूंनीही या तक्रारीला पाठिंबा दर्शवला आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सुमितने या संदर्भात हिंदुस्थान क्रीडा प्राधिकरणाकडे (SAI) अधिकृत तक्रार दाखल केली आहे. सुमितच्या म्हणण्यानुसार, प्रशिक्षक नवल सिंग गेल्या अनेक दिवसांपासून त्याला आणि नीरज चोप्राला लक्ष्य करत आहेत. नवल सिंग यांनी केवळ वैयक्तिक टीका केली नसून, खेळाडूंच्या कुटुंबाबद्दलही अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन अपशब्द वापरले आहेत. नवल सिंग मानसिकदृष्ट्या अस्थिर वाटतात. ते जाणीवपूर्वक स्वतःच्या शिवीगाळ करणाऱ्या ऑडिओ क्लिप आमच्या मॅनेजर्सना पाठवतात, जेणेकरून ते आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आमचे मानसिक खच्चीकरण होईल,” असा खळबळजनक दावा सुमितने केला आहे.
या वादामागे स्पर्धात्मक हितसंबंध असल्याचेही सुमितने सूचित आहे आहे. नवल सिंग सध्या भालाफेकपटू सचिन यादवला प्रशिक्षण देत आहेत. सचिनने नीरज चोप्राला मागे टाकावे, या ईर्षेतून हे प्रशिक्षक इतर खेळाडूंना त्रास देत असावेत, अशी शक्यता सुमितने वर्तवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तक्रार करून एक आठवडा उलटला तरी क्रीडा प्राधिकरणाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, उलट तडजोड करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप सुमितने केला आहे.
दुसरीकडे, भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) सुमितची तक्रार मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, नवल सिंग हे क्रीडा प्राधिकरणाचे कर्मचारी नसून ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (AFI) अंतर्गत राष्ट्रीय शिबिराचा भाग असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. हे प्रकरण आता संबंधित फेडरेशनकडे सोपवण्यात आले आहे. सुमित अंतिलसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूने केलेल्या या आरोपांमुळे क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, यावर नवल सिंग यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
Comments are closed.