IPL 2026 – मुंबई इंडियन्सचा सलग चौथा पराभव; ‘हार्दिककडे उत्तरं नाहीत,’ अश्विनने सांगितले कारण
आयपीएल 2026 च्या हंगामात मुंबई इंडियन्सची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, सलग चौथ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर आणि संघाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पराभवानंतर हताश झालेल्या हार्दिकने आपल्याकडे बोलण्यासारखे काहीही उरले नसल्याची कबुली दिली. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि सध्याचा समालोचक रविचंद्रन अश्विन याने मुंबई इंडियन्सच्या पराभवामागचे कारण सांगितले आहे. अश्विनच्या मते, हार्दिकची हतबलता ही या गोष्टीचे प्रतीक आहे की, मुंबईच्या व्यवस्थापनाकडे मैदानावर उद्भवणाऱ्या समस्यांचे कोणतेही ठोस उपाय सध्या उपलब्ध नाहीत.
अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, मुंबईचे गोलंदाज सातत्याने महागडे ठरत आहेत आणि आधुनिक क्रिकेटमध्ये प्रत्येक षटकात 20 धावा देणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी संघाच्या धावसंख्येत 20 धावा कमी असल्याचे म्हटले असले तरी, अश्विनच्या मते मुंबईची गोलंदाजी इतकी कमकुवत आहे की त्यांनी 230 धावा केल्या असत्या तरी त्याचा बचाव करणे त्यांना शक्य झाले नसते. घरच्या मैदानावर खेळतानाही मुंबईच्या गोलंदाजांनी कोणताही प्रभाव पाडला नाही. विशेषतः दीपक चहरचे पहिले षटक आणि त्यानंतर 9 व्या-10 व्या षटकातील कमकुवत गोलंदाजीमुळे मुंबईचा संघ सामन्यातून पूर्णपणे बाहेर फेकला गेला.
मुंबईच्या चिंतेत भर टाकणारी बाब म्हणजे मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहला या हंगामात अद्याप एकही विकेट मिळवता आलेली नाही. ट्रेंट बोल्ट, दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांसारखे अनुभवी गोलंदाजही धावा रोखण्यात अपयशी ठरत आहेत. अश्विनने या अपयशामागे टी-20 विश्वचषकाचा थकवा हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे नमूद केले. विश्वचषकाचा मोठा हंगाम आणि त्यानंतर लागलीच आयपीएल सुरू झाल्यामुळे खेळाडूंवर मानसिक आणि शारीरिक ओझं स्पष्टपणे जाणवत आहे. गोलंदाजीतील या त्रुटींमुळे मुंबईचा संघ या संकटातून कसा बाहेर पडणार, याबाबत अश्विनने साशंकता व्यक्त केली आहे. एकेकाळी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवणारा हा संघ आता चेंडूने उत्तर देण्यास असमर्थ ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.
Comments are closed.