फोन बंद करा, रिलॅक्स व्हा अन् आठवड्याभरासाठी Bibi ला ब्लॉक करा! इराणच्या दूतावासाचा ट्रम्प यांना टोला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत झालेल्या कथित कराराबाबत मोठ्या घोषणा केल्या असल्या, तरी इराणने मात्र हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट शेअर करत म्हटले की, इराणने जगासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) मार्ग यापुढे कधीही बंद न करण्याचे मान्य केले आहे. या मार्गाचा शस्त्रासारखा वापर केला जाणार नाही आणि इराण आपले समृद्ध युरेनियम (Nuclear Dust) अमेरिकेकडे सोपवण्यास तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.

ट्रम्प यांच्या या दाव्यावर झिम्बाब्वेमधील इराणच्या दूतावासाने सोशल मीडियाद्वारे टीका केली आहे. दूतावासाने म्हटले की, खूप जास्त आनंदी होऊ नका, थोडे गांभीर्य ठेवा. इराणच्या सागरी हद्दीबाबत नवीन कायदेशीर नियमांचा विचार करू नका, ते आम्ही पाहून घेऊ.” तसेच, ट्रम्प यांना आपला फोन आठवड्याभरासाठी बंद करून शांत झोपण्याचा आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना एक आठवडा ‘ब्लॉक’ करण्याचा खोचक सल्लाही इराणने दिला आहे.

इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बागेर गालिबाफ यांनीही ट्रम्प यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. ट्रम्प यांनी एका तासात सात खोटे दावे केल्याचा आरोप गालिबाफ यांनी केला. अमेरिकेने इराणची आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केल्यास, इराण प्रत्युत्तर म्हणून होर्मुझची सामुद्रधुनी हा सागरी मार्ग बंद करू शकतो, असा इशारा देत त्यांनी ट्रम्प यांच्या दाव्यांमधील हवा काढून टाकली आहे.

इराणने समृद्ध युरेनियम अमेरिकेला देण्याचा कोणताही करार झाल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. पाकिस्तानमध्ये होऊ घातलेल्या संभाव्य शांतता चर्चेपूर्वी अमेरिकेने मोठे यश मिळाल्याचे चित्र निर्माण केले होते; परंतु इराणच्या या तीव्र प्रतिक्रियांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाकेबंदी सुरूच राहिली तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार नाही; इराणने अमेरिकेला ठणकावलं, ट्रम्प यांचे ‘ते’ 7 दावेही खोडून काढले

Comments are closed.