आजी-माजी नगरसेविकांच्या भांडणावर भाजपचा पडदा टाकण्याचा प्रयत्न; स्वतःच्याच कार्यकर्त्यांना ठरवले तिर्हाईत
भाजपच्या विद्यमान आणि माजी नगरसेविकांमध्ये झालेल्या जोरदार वादानंतर पक्षाची चांगलीच नाचक्की झाल्यानंतर आता या प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. स्वतःच्याच कार्यकर्त्यांना तिर्हाईत ठरवत भाजपने या भांडणातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
बाणेर येथील आदिवासी विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येणार्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून भाजपच्या विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे आणि माजी नगरसेविका राजश्री काळे यांच्यात बुधवारी जोरदार वाद झाला होता. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता. शिवीगाळपर्यंत पोहोचलेल्या या प्रकारामुळे टक्केवारीचा मुद्दाही गाजू लागला होता. मात्र, आता या सर्व प्रकरणाला वेगळेच वळण देत भाजपच्या गटनेते गणेश बिडकर यांनी हा वाद तिर्हाईत व्यक्तींनी निर्माण केलेल्या गैरसमजातून झाला असा दावा करत प्रकरण मिटल्याचे सांगितले. भाजप हा एक परिवार असून आमच्यात कोणताही वाद नाही, असे सांगत यावर पडदा टाकला.
दरम्यान, भाजपमधीलच दोन महिला नगरसेविकांमधील वादावर आपल्याच कार्यकर्त्यांवर तिर्हाईत हा शिक्का मारत पक्षाने आपली प्रतिमा वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.
Comments are closed.