भारत भविष्यातील सुरक्षा आव्हानांसाठी सज्ज आहे.

‘आर्मी कमांडर कॉन्फरन्स’मध्ये विविध गरजांवर विचार : ‘आत्मनिर्भर’ बनण्यावरही अधिक भर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय लष्कर युद्धाच्या झपाट्याने बदलणाऱ्या स्वरूपाशी जुळवून घेत आहे. तंत्रज्ञान, डेटा आणि ड्रोन-आधारित युद्धतंत्राच्या दिशेने प्रगती करून भारत भविष्यातील कोणत्याही सुरक्षा आव्हानासाठी स्वत:ला सज्ज करत असल्याचे प्रतिपादन येथे आयोजित ‘आर्मी कमांडर कॉन्फरन्स’मध्ये करण्यात आले. आज भारताच्या सुरक्षेसाठी एक मजबूत लष्करी शक्ती आवश्यक आहे. सध्याच्या जागतिक पुरवठा साखळीतील संकट पाहता भारताने संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर व्हायलाच हवे, यावरही बैठकीत प्रकाश टाकण्यात आला.

भारतीय लष्कराची सर्वोच्च स्तरावरील बैठक म्हणजेच ‘लष्कर कमांडर परिषद’ (एसीसी) नुकतीच पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीचे अध्यक्षस्थान लष्करप्रमुखांनी भूषवले. या परिषदेत वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह संरक्षण विभागातील सरकारचे उच्चस्तरीय प्रतिनिधी उपस्थित होते. कॅबिनेट सचिव, मुख्य संरक्षण अधिकारी, संरक्षण सचिव, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आणि नौदल प्रमुख यांनीही सहभाग घेतला.

या बैठकीत सरकार आणि लष्कर यांच्यात सुधारित समन्वय आणि संयुक्त रणनीतीवर विशेष भर देण्यात आला. युद्धाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे यावर सर्व सहभागी सहमत झाले. आता पारंपरिक शस्त्रास्त्रांसोबतच तंत्रज्ञान-आधारित युद्धासाठी तयारी करणे आवश्यक आहे. सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी केवळ लष्करानेच नव्हे, तर सरकार, नागरी संस्था आणि इतर संस्थांनी एकत्र काम केले पाहिजे, हे देखील परिषदेत स्पष्ट करण्यात आले.

2026 हे नेटवर्किंग व डेटा केंद्रीकरणाचे वर्ष घोषित

भारतीय लष्कराने 2026 हे वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रीकरणाचे वर्ष म्हणून घोषित केले आहे. या घोषणेमुळे यावर्षी लष्कराचे संपूर्ण लक्ष तंत्रज्ञान आणि डेटाच्या वापरावर असेल. या बैठकीत लष्कराला बळकट करणे, नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे, प्रशिक्षण आणि नवीन युद्धनीती यावरही चर्चा झाली. या बैठकीत ज्या दोन तंत्रज्ञानांवर सर्वाधिक भर देण्यात आला, त्यांना लष्कराचे नवीन ‘ब्रह्मास्त्र’ म्हणून पाहिले जात आहे. लष्कराला अधिक तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवणे, जेणेकरून भविष्यातील युद्धांमध्ये जलद निर्णय घेणे आणि उत्तम समन्वय साधता येईल, हे यामागील उद्दिष्ट आहे.

आधुनिकीकरणासह नवीन तंत्रज्ञानावर लक्ष

या परिषदेत लष्कराचे आधुनिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाचा समावेश यावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये युद्धात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण आणि रणनीतीमधील बदल, तसेच नेटवर्क-आधारित कारवायांचा समावेश होता. बदलती जागतिक परिस्थिती पाहता भारताला आपल्या सुरक्षेसाठी एका मजबूत लष्करी दलाची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी विविध सरकारी विभाग आणि लष्कर यांच्यात उत्तम समन्वय आणि राष्ट्रीय स्तरावर एकसंध कामाची आवश्यकता आहे. संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन वेगाने वाढवण्याच्या गरजेवरही या बैठकीत भर देण्यात आला.

ड्रोनविरोधी प्रणाली बळकट करणार

अलीकडील मोहिमांमधून विशेषत: ‘ऑपरेशन सिंदूर’मधून मिळालेल्या अनुभवांच्या आधारे, ड्रोन युद्धतंत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. या बैठकीत मानवरहित हवाई प्रणालीच्या (युएएस) वापरावर आणि काउंटर-युएएस (सी-युएएस) प्रणाली अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. या परिषदेत जागतिक आणि प्रादेशिक सुरक्षा परिस्थितीवरही चर्चा झाली.

Comments are closed.