एक व्यक्ती, तीन पक्ष
सध्या निवडणुकांचा ‘सीझन“ आहे. चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्या विधानसभा निवडणुकांची धामधूम आहे. दोन राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश येथे मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर या महिन्याअखेर दोन राज्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे चर्चा निवडणुकांचीच आहे. अशाच एका निवडणुकीची ही कहाणी असून ती मोठ्या आश्चर्याचा विषय बनली आहे.
गुजरात राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे तीन मोठे पक्ष या निवडणुकांमध्ये एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. दाहोद जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीतला हा प्रकार आहे. या पंचायतीच्या पिपेरो नामक स्थानी एकच व्यक्ती या तीन्ही पक्षांचा उमेदवार आहे. या व्यक्तीचे नाव भरतसिंग वखाला असे आहे. या व्यक्तीने भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या तीन्ही पक्षांच्या वतीने निवडणूक अर्ज सादर केले आहेत. या जागेसाठी एकंदर 11 उमेवारी अर्ज सादर करण्यात आले आहेत. त्यांच्यापैकी 5 भारतीय जनता पक्षाच्या वतीने, आम आदमी पक्षाचा एक अज आणि काँग्रेसचे दोन अर्ज आहेत. उरलेले तीन अर्ज अपक्षांचे आहेत. तथापि, भरतसिंग वखाला याने या तीन्ही मोठ्या पक्षांच्या वतीने अर्ज सादर केले आहेत, असे अर्जांची छाननी करताना दिसून आले आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारीही चक्रावून गेले आहेत. कोणत्याही व्यक्तीला केवळ एकाच पक्षाकडून उमेदवारी अर्ज सादर करता येतो, असा नियम आहे. तरीही वखाला यांना तीन्ही पक्षांकडून उमेदवारी कशी मिळाली, हा आता चर्चेचा विषय बनला आहे. वखाला हे पूर्वी आम आदमी पक्षाकडून निवडणुकीत उतरले होते. आता ते तीन्ही पक्षांकडून आहेत, याचे आश्चर्य केले जात आहे.
Comments are closed.