पक्षी 'आत्महत्या' करतात
दु:ख किंवा वेदना सहन न झाल्याने काही माणसे आत्महत्या करतात, हे सर्वांना ज्ञात आहे. तथापि, पक्षीही आत्महत्या करतात, हे समजल्यानंतर मोठेच आश्चर्य वाटते. आत्महत्या हा भावनातिरेकातून घडलेला प्रकार असतो. पण पशुपक्ष्यांना माणसासारख्या संवेदना असत नाहीत. तसेच त्यांची स्मरणशक्तीही अत्यल्प असते. त्यामुळे आत्महत्या करण्याइतका भावनेचा तीव्र उद्रेक मानव सोडून अन्य प्रजातींमध्ये कधी होत नाही, असे विज्ञानही म्हणते. त्यामुळे पक्ष्यांच्या आत्महत्या हा प्रकार विज्ञानालाही चक्रवून टाकणारा आहे. पण तो सत्य आहे.
आसाम राज्याच्या दिमा हासो जिल्ह्यातील जांतीगा हे ग्राम पक्ष्यांच्या आत्महत्यांमुळे प्रसिद्धीस आलेले आहे. या ग्रामी प्रत्येक वर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्याच्या कालखंडात पक्ष्यांच्या आत्महत्यांची वृत्ते येऊ लागतात. या काळात संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत जोराचे वारे वहात असतील आणि कोठे आग भडलेली असेल, तर विशिष्ट प्रकारचे पक्षी त्या आगीवर झेप घेतात आणि आत्महत्या करतात, असे दिसून येते. असे करणाऱ्या पक्ष्यांच्या जवळपास 40 प्रजाती असून या प्रजातींमध्ये स्थानिक आणि प्रवासी अशा दोन्ही प्रकारच्या प्रजातींचा समावेश आहे. या काळात या भागात लोकांना जाण्यास बंदी असते.
आग किंवा कोणत्याही प्रकाशमान वस्तूंवर स्वत:ला आदळवून पक्षी प्राणत्याग करीत असले, ती वैज्ञानिकांच्या दृष्टीने त्या आत्महत्या नसतात. तर ते विशिष्ट नैसर्गिक परिस्थितीत घडलेले अपघातच असतात. मोठ्या प्रमाणावर जलवृष्टी झाली असेल, किंवा दाट धुके पडले असेल, तर पक्षांचे पंख ओले आणि जड होतात. त्यामुळे ते उष्णता ज्या स्थानी आहे अशा स्थानी जाऊ लागतात. जाताना ते वाटते येणाऱ्या झाडांवर किंवा जडवस्तूवर आदळून प्राण गमावतात. या आत्महत्या नसून अपघातच असतात. काहीवेळा दाट अंधारात पक्ष्यांची दिशा भरकटते आणि ते घाबरुन वेगाने प्रकाश दिसेल त्या स्थानी जाऊ लागतात. अशावेळीही त्यांचे त्यांच्या वेगावर नियंत्रण रहात नाही आणि ते प्रकाशमान वस्तूवर किंवा अन्य कोणत्याही घट्ट वस्तूवर आदळून प्राण गमावतात. दुरुन पाहणाऱ्याला ते आत्महत्या करतात असे दिसले तरी, प्रत्यक्षात तशी परिस्थिती नसते, असे संशोधकांनी अभ्यासाने स्पष्ट केले तरीही, ते आत्महत्या करतात अशीच जनभावना आहे.
Comments are closed.