दिल्लीतील मोठ्या हल्ल्याचा कट फसला

आयईडी बनवण्याच्या तयारीत असलेल्या चार संशयितांना अटक : महाराष्ट्र, ओडिशा, बिहारमध्ये कारवाई

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका मोठ्या कारवाईत देशात दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचणाऱ्या चार संशयितांना अटक केली आहे. आरोपींना महाराष्ट्र, ओडिशा आणि बिहार या वेगवेगळ्या राज्यांमधून अटक करण्यात आली. ते खेळण्यांमध्ये बॉम्ब लपवून हल्ला करण्याच्या तयारीत होते. अयोध्येतील राम मंदिर आणि संसद भवन त्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पुढे आली आहे. त्यांच्याकडून आयईडी बनवण्याचे साहित्य आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने महाराष्ट्र, ओडिशा आणि बिहारमधून चार संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आयईडी आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींपैकी दोघांना महाराष्ट्रातून, तर ओडिशा आणि बिहारमधून प्रत्येकी एकाला अटक झाली. त्यांची नावे मोसाईब अहमद, मोहम्मद हम्माद, मोहम्मद सोहेल आणि शेख इम्रान अशी असल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले. आरोपींपैकी दोघे रिमोट कंट्रोल असलेल्या खेळण्यातील गाडीमध्ये आयईडी बसवण्याच्या तयारीत होते.

अटक करण्यात आलेले सर्व तरुण कट्टरपंथी विचारांनी प्रभावित होते आणि द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने काम करत होते. ते ‘गझवा-ए-हिंद’सारख्या धोकादायक विचारांचा प्रचार करत होते. तसेच इतरांनाही तसे करण्यास प्रवृत्त करत होते. हे आरोपी सोशल मीडिया ग्रुप्समध्ये सामील होऊन दहशतवादी विचारसरणी, जिहाद आणि शस्त्रास्त्र व्यवहारांवर संवाद साधत असल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच ते स्फोटासाठी आयईडी बनवण्याची तयारी करत होते, अशी माहितीही पुढे आली आहे.

विविध गटांच्या माध्यमातून हे संशयित नवीन लोकांची भरती करत होते आणि त्यांना भडकवत होते. दोन आरोपी रिमोट-कंट्रोल आयईडी (बॉम्ब) बनवण्याच्या तयारीत होते. स्फोटके निर्मितीसाठी बॉल बेअरिंग, खिळे आणि खेळण्यातील गाड्या यांसारखे आवश्यक साहित्य आधीच गोळा करण्यात आले होते.

लाल किल्ला, इंडिया गेटची टेहळणी

आरोपींपैकी एक जण डिसेंबर 2025 मध्ये दिल्लीत आला होता. त्याने लाल किल्ला व इंडिया गेट यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांची टेहळणी केली होती. त्याने लोकांना भडकवण्यासाठी सोशल मीडियावर लाल किल्ल्याच्या फोटोसोबत आक्षेपार्ह पोस्टही शेअर केल्या होत्या, असे दिसून आले आहे.

सोशल मीडियाद्वारे क्राउडफंडिंग

अटक केलेल्या तरुणांपैकी एक जण सोशल मीडियाद्वारे पैसे (क्राउडफंडिंग) गोळा करत होता, तर दुसरा शस्त्र प्रशिक्षणाचे आश्वासन देऊन त्यासाठी पैसे मागत होता. चारही आरोपी सामान्य कुटुंबातील असून बहुतेकांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. काही मेकॅनिक, काही सुरक्षा रक्षक आणि काही प्लंबर आहेत. मात्र, सोशल मीडिया आणि कट्टरतावादी विचारांच्या प्रभावाखाली ते चुकीच्या मार्गावर गेले होते. विशेष पथकाने त्या सर्वांविरुद्ध भारतीय दंड संहिता 2023 च्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

अटक केलेले संशयित…

मोसाईब अहमद उर्फ सोनू (महाराष्ट्र): मूळचा आझमगडचा असलेला हा तरुण व्यवसायाने ऑटो मेकॅनिक आहे. त्याने आयईडी तयार करण्यासाठी तांत्रिक मदत केली.

मोहम्मद हम्माद (महाराष्ट्र) : मुंबईचा रहिवासी असलेला हा बारावीचा विद्यार्थी आहे. त्याने आयईडीसाठी बॉल बेअरिंग, खिळे आणि रिमोट सर्किट यांसारखे साहित्य गोळा केले.

शेख इम्रान (ओडिशा) : भुवनेश्वरचा रहिवासी असलेला हा तरुण माजी सुरक्षारक्षक आहे. त्याने दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणांची टेहळणी केली. तसेच मॉड्यूलच्या प्रशिक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती.

मोहम्मद सोहेल (बिहार) : कटिहारचा रहिवासी असलेला हा प्लंबर, सोशल मीडियावर तरुणांना भडकवत होता. तसेच दहशतवादी कारवायांसाठी क्राउडफंडिंग गोळा करत होता.

Comments are closed.