बंगालमधील I-PAC चे कामकाज ठप्प झाले आहे का?
कर्मचाऱ्यांना रजेवर पाठविल्याचा दावा : तृणमूलची ‘भ्रामक कटा’ची टिप्पणी
वृत्तसंस्था/ कोलकाता
बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी एका घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणूक व्यूहनीतिकार संस्था ‘आय-पॅक’चे कामकाज अस्थायी स्वरुपात बंद करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. आय-पॅकच्या कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या एका ईमेलमध्ये ‘कायदेशीर बंधनां’चा दाखला देत 20 दिवसांच्या रजेवर जाण्याचा निर्देश देण्यात आला आहे. परंतु राज्यातील सत्तारुढ तृणमूल काँग्रसने हा दावा फेटाळत याला विरोधी पक्षांचा एक ‘सूनियोजित कट’ ठरविले आहे.
सॉल्टलेक येथील आय-पॅक कार्यालयातून कर्मचाऱ्यांना ईमेल पाठविण्यात आला आहे. यात काही कायदेशीर अडचणींमुळे बंगालमधील कामकाज सध्या रोखले जात असल्याचे म्हटले गेले आहे. कर्मचाऱ्यांना 11 मेपर्यंत रजेवर पाठविण्यात आले आहे.
कोळसा घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी अलिकडेच ईडीकडून आय-पॅकचे सह-संस्थापक आणि संचालक विनेश चंदेल यांना अटक आणि संस्थेच्या कार्यालयांवर छापेमारीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. मतदानाच्या महत्त्वपूर्ण तारखांदरम्यान (23 आणि 29 एप्रिल) आय-पॅकची अनुपस्थिती तृणमूलच्या प्रचार व्यवस्थापनाला प्रभावित करू शकते अशी चर्चा आहे.
सर्वकाही सुरळीत : तृणमूल
आय-पॅक संबंधीच्या वृत्तांमुळे चर्चा सुरू होताच तृणमूल काँग्रेसने अधिकृत वक्तव्य जारी करत स्थिती स्पष्ट केली. आय-पॅकद्वारे कामकाज रोखल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार आणि भ्रामक आहे. आय-पॅकची बंगाल टीम पूर्णपणे सक्रीय आहे आणि आमची निवडणूक व्यूहनीति योजनेनुसार राबविली जात आहे. बंगालच्या जनतेचे लक्ष विचलित करणे आणि तळागाळात भ्रम निर्माण करण्यासाठी हे खोटे दावे केले जात आहेत. 4 मे रोजीचा निकाल या कटांना चोख प्रत्युत्तर देणार असल्याचे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे.
Comments are closed.