देशाचा राजा खुर्चीवर कायम राहील, पण…; भेंडवळच्या घटमांडणीत कोणकोणते भाकीत वर्तवले?

भेंडवाल घाटमांडणी भविष्यवाणी 2026: बुलढाण्यामधील भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज आज जाहीर करण्यात आला. (Bhendwal Ghatmandni Bhavishyvani 2026) सुमारे 370 वर्षांपासूनची असलेली भेंडवळच्या घट मांडण्याची परंपरा आजही कायम आहे. काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी  घटमांडणी (Buldhana Bhendwal Ghatmandni) करण्यात आली व आज सकाळी सूर्योदयावेळी या घटमांडणीचे निरीक्षण करून वर्षभराचे पीक पाणी पाऊस राजकीय व देशाच्या संरक्षण स्थितीबद्दलचे अंदाज जाहीर करण्यात आले.

घट मांडणीतून निघालेल्या निष्कर्षानुसार देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान हे त्यांच्या खुर्चीवर कायम राहतील. मात्र ते तणावात राहतील. तर देशाची संरक्षण स्थिती ही कमकुवत राहील संरक्षण खात्यावर मोठा ताण असेल असाही अंदाज भेंडवळच्या घटमांडणीतून समोर आला आहे. शेतकऱ्यांसाठी यंदा पुन्हा अडचणीच वर्ष ठरू शकतो. यंदा सर्व पिकांवर रोगराईचं प्रमाण जास्त असल्याचा निष्कर्ष यातून निघाला आहे. मात्र कापूस तीळ अशा प्रकारची पीक भरपूर होतील व त्यांना भावही मिळेल, असा निष्कर्ष भेंडवळच्या गट मांडणीतून निघाला आहे. (Bhendwal Ghatmandni 2026)

यंदाच्या गट मांडणीतून निघालेले प्रमुख निष्कर्ष- (Bhendwal Ghatmandni Marathi News)

  • पिकांवर रोगराईचं प्रमाण जास्त असेल.
  • कापूस, तांदूळ पिकाचे उत्पन्न भरपूर.
  • ज्वारी , तूर, मुंग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिके सर्वसाधारण असतील.
  • तीळ, बाजरी हे पीक भरपूर येईल.
  • देशाची संरक्षण स्थिती तणावात असेल
  • राजा कायम असेल…
  • देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नाही.
  • पाऊस जूनमध्ये भरपूर, जुलै सर्वसाधारण, ऑगस्ट, सप्टेंबर कमी असेल…
  • अनेक भागात महापुरामुळे नुकसान होणार.

अंदाज आणि भाकिते  कशावरून व्यक्त केली जातात? (Bhendwal Bhavishyvani 2026)

घटामध्ये रात्रभर होणाऱ्या नैसर्गिक बदलाचे पहाटे सूक्ष्म निरीक्षण केले जाते. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पाऊस, हवामान, पीक, अर्थव्यवस्था तसेच देशाचे राजकीय तथा नैसर्गिक संकटाबाबत चाहूल देणारे भाकीत वर्तवण्यात येते. या भविष्यवाणीवर शेतकऱ्यांचा अतुट विश्वास आहे. या भाकिताचा आधार घेऊन ते आपल्या पिकपाण्याचे नियोजन करत असतात. मातीच्या ढेकळावरून चार महिन्यांच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. विविध धान्यांवरून आगामी हंगामातील पिके कसे राहतील, हे सांगण्यात येते. चारा-पाणीसाठी सांडाई, कुरडई, तर पुरी निसर्गाशी संबंधित राहते. करंजीवरून देशाची आर्थिक परिस्थिती सांगण्यात येते. भादली हे रोगराईचे, तर पान-विडा राजाच्या गादीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. राजा म्हणजे पंतप्रधान. पान, विड्यात होणाऱ्या बदलावरून भविष्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले जाते. मसूर हे पीक परकीय घुसखोरीचे द्योतक आहे.

शेतकरी यावर विश्वास का ठेवतात आणि शेतकऱ्यांसाठी भाकीत महत्त्वाचे का? (Bhendwal Bhavishyvani 2026)

घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी विदर्भ, खानदेश, मराठवाड्यासह अनेक भागातून शेतकरी भेंडवळमध्ये मुक्कामाला येतात, या परिसरात हजारोंच्या संख्येने शेतकरी एकत्रित जमतात. शेतकरीच नव्हे तर बी-बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधीही शेतकऱ्यांचा आगामी काळातील कल लक्षात घेण्यासाठी येथे गर्दी करतात. शेतकरी वर्ग घटमांडणीचे भाकीत घेऊन पुढील हंगामाची पेरणी काय करायची, हे ठरवत असतात. पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाजही वर्तवण्यात येत असल्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांसाठी ही घटमांडणी आशेचा किरण बनली आहे.

घटमांडणीला शास्त्रीय आधार आहे का? (Buldhana Bhendwal Ghatmandni)

घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही परंपरेनं बळीराजाच्या मनातील महत्त्व कमी झालेलं नाही. भेंडवळची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून, याच भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सकता पाहायला मिळते. घटमांडणीनंतर वर्तवलेली पाऊस, पीक-पाणी, राजकीय, आर्थिक भाकितं बऱ्याचदा खरी ठरली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निव्वळ ठोकताळे म्हणत असले, तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे.

(टीप : ‘भेंडवळची घट मांडणी’ ही बुलढाण्यातील भेंडवळ गावातील स्थानिक परंपरा आहे. त्यातून ते पावसाचा अंदाज वर्तवतात असा त्यांचा दावा आहे. स्थानिकांचा त्यावर विश्वास आहे. एबीपी माझा केवळ या घटनेचं वार्तांकन करतंय. घटमांडणीच्या परंपरेचं समर्थन करत नाही.)

भेंडवळची भविष्यवाणी जाहीर, VIDEO:

संबंधित बातमी:

Bhendwal Bhavishyvani 2026: जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती

Buldhana Ghatmandni : बुलढाण्यातील भेंडवळची घटमांडणी परंपरा नेमकी काय? वर्षभराचे अंदाज नेमके कसे व्यक्त केले जातात?

आणखी वाचा

Comments are closed.