मणिपूरमध्ये दोन नागा नागरिक ठार

उखरुलमधील घटनेनंतर पुन्हा हिंसाचार भडकला

वृत्तसंस्था/ इंफाळ

मणिपूरमधील वांशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री उखरुल जिह्यात अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार करून दोन नागा नागरिकांना ठार केले. ही घटना इंफाळ-दिमापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली. मृतांची नावे चियाओशांग शोखवुंगनाओ (45) आणि यारुइंगम वशुम (42) अशी आहेत. शोखवुंगनाओ हे तशर गावचे रहिवासी आणि नागा रेजिमेंटमधील निवृत्त लष्करी जवान रुइचुमहाओ शोखवुंगनाओ यांचे पुत्र होते. तर यारुइंगम वशुम हे खरासोम गावचे रहिवासी असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मणिपूरमधील घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. तंगखुल नागा लाँगच्या कार्यकारी समितीने या हल्ल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून हा हल्ला कुकी गटाने केल्याचा आरोप केला आहे. हा गट सध्या सरकारसोबत कारवाया स्थगित करण्याच्या प्रयत्नात आहे. हत्येची ही घटना याओलेन कुकी गावाजवळ घडली आणि दोन्ही पीडितांचा जागीच मृत्यू झाला. लोकांचा महिला, मुलांसह प्रवास सुरू असताना हा हल्ला झाला. ताफ्यातील सहा वाहनांना लक्ष्य करण्यात आले. हल्लेखोरांनी स्नायपरसह अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला. तंगखुल नागा लाँगने राज्य आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, त्यांच्या निक्रियतेमुळे दहशतवादी गटांना अधिक बळ मिळाल्याचे म्हटले आहे.

Comments are closed.