बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, पण काही लोकांनी…; पार्थ पवारांचा मोठा दावा

बारामती पोटनिवडणुकीत पार्थ पवार बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीने (Baramati By Election 2026) सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार पार्थ पवार (Parth Pawar) यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना एक मोठा दावा केला आहे. बारामतीची निवडणूक ही बिनविरोध व्हायला पाहिजे होती. मात्र, काही लोकांनी उमेदवारांना मुद्दाम उभं केलं, असं त्यांनी म्हटलंय. तसेच, आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. उन्हात मतदारांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील, असे देखील पार्थ पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांच्या प्रचारासाठी उद्या होणाऱ्या सांगता सभेवर देखील पार्थ पवार यांनी भाष्य केले आहे.

Parth Pawar on Baramati By Election: पार्थ पवारांचा मोठा दावा

निवडणूक बिनविरोध न होण्याबाबत विचारले असता पार्थ पवार म्हणाले की, अनेक लोकांची इच्छा होती की बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. परंतु, निवडणूक बिनविरोध झालेली नाही. काही लोक जे उभे राहिले आहेत  त्यांच्या अनेक मागण्या होत्या. काही  प्रतिस्पर्धी उमेदवारांना मुद्दाम उभे केले आहे, असा मोठा दावा त्यांनी केला. पार्थ पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Parth Pawar on Baramati By Election: सांगता सभेची जय्यत तयारी

सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उद्या होणाऱ्या सांगता सभेच्या नियोजनाबाबत पार्थ पवार यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, सभेच्या स्थळाची पाहणी सुरू आहे. उद्या सांगता सभा होत आहे. इथे ऊन खूप आहे. राज्यभरातून अनेक लोक उद्या इथे येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउदय सामंत, रामदास आठवले सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Parth Pawar on Baramati By Election: उन्हाचे मोठे आव्हान

दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीतील विजयाचा विश्वास व्यक्त करताना पार्थ पवार यांनी सांगितले की, आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. मतदारांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. ऊन खूप आहे. उन्हात लोकांना कसं बाहेर काढायचं हा एक मोठा टास्क आहे. आम्ही चांगल्या मतांनी तर शंभर टक्के निवडून येणार आहोत. पण, आम्हाला दोन लाख 70 हजारांचा रेकॉर्ड मोडायचा आहे, असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: ‘हा वाद माझ्या आटोक्याबाहेर’; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.