आखातातील शांततेसाठी फोनाफोनी; ट्रम्प यांच्या घोषणेनंतर शरीफ-पेझेश्कियान यांच्यात 45 मिनिटे चर्चा
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी रविवारी दूरध्वनीवरून संवाद साधल्याचे वृत्त आहे. आखातातील तणावाची परिस्थिती निवळण्यासाठी सविस्तर चर्चा झाल्याचे कळते आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी आपले शिष्टमंडळ इस्लामाबादला पाठवण्याची घोषणा केल्यानंतर काही वेळातच या दोन नेत्यांमध्ये झालेली ही चर्चा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 45 मिनिटे मैत्रिपूर्ण वातावरणात संवाद झाला. यावेळी शहबाज शरीफ यांनी नुकत्याच केलेल्या सौदी अरेबिया, कतार आणि तुर्कस्तानच्या दौऱ्यांचा संदर्भ देत तेथील नेत्यांशी झालेल्या चर्चेची माहिती पेझेश्कियान यांना दिली. दोन्ही नेत्यांनी आखातातील सुरक्षेच्या मुद्द्यावर एकमेकांच्या भूमिका समजून घेतले. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये २१ तास थेट चर्चा झाली होती, मात्र त्यातून कोणताही ठोस तोडगा निघाला नव्हता. आता ट्रम्प यांनी चर्चेची दुसरी फेरी सोमवारी इस्लामाबादमध्ये पार पडणार असल्याचे जाहीर केल्याने प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामाला मुदतवाढ मिळण्याच्या आशाही या घडामोडींमुळे वाढल्या आहेत.
Comments are closed.