लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक

लातूर : राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात (Education) लातूर पॅटर्न चांगलाच गाजला, या पॅटर्नमागे अनेकांचं डोकं आणि कार्य राहिलेलं आहे. याच लातूर पॅटर्नला राज्यभरात ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी खासदार आणि शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील यांचे आज सकाळी निधन झाले, ते 94 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने केवळ लातूरच (Latur) नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तर, दिग्गजांनी त्यांच्या आठवणी जागवत श्रद्धांजली अर्पण केली.

माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. शिक्षण, वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोठे होते. वैद्यकीय सेवांमुळे त्यांना लोक ‘देवमाणूस‘ म्हणायचे. त्यांच्या शिक्षण संस्थेमुळे लातूरला राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक ओळख प्राप्त झाली. मलाही या शिक्षण संस्थेत कार्यक्रमाच्या निमित्ताने जाण्याची संधी मिळाली. मराठवाड्यातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी डॉक्टर, अभियंते म्हणून घडवले, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

समाजसेवक डॉक्टर नव्हे तर “देवमाणूस”

३ ऑक्टोबर १९३१ रोजी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कवठा येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी ओस्मानिया विद्यापीठ येथून एमबीबीएस आणि डीसीएच पदवी प्राप्त केली. बालरोगतज्ज्ञ म्हणून त्यांनी लातूरमध्ये दीर्घकाळ सेवा दिली. १९६५ साली त्यांनी लातूरमध्ये खाजगी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्याचबरोबर मुरुड परिसरात तब्बल १२ वर्षे विनामूल्य वैद्यकीय सेवा देत त्यांनी समाजात वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे लोक त्यांना ‘देवमाणूस’ म्हणून ओळखू लागले.

शिक्षणातला डॉक्टर

डॉ. पाटील हे शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली लातूरमध्ये शिक्षणाची भक्कम पायाभरणी झाली आणि त्यातूनच पुढे ‘लातूर पॅटर्न’ उदयास आला. या पद्धतीमुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत डॉक्टर, इंजिनिअर आणि अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले.

त्यांनी इंडियन पेडियाट्रिक असोसिएशन ची शाखा स्थापन करून पहिले अध्यक्ष म्हणून काम पाहिले. अनेक राष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. १९९८ साली त्यांना ‘सर्वोत्कृष्ट डॉक्टर संसदपटू’ हा सन्मान मिळाला होता.

राजकारणातला डॉक्टर

राजकीय क्षेत्रातही डॉ. गोपाळराव पाटील यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. मराठवाड्यात भारतीय जनता पार्टी चा पाया मजबूत करण्यात त्यांची भूमिका मोठी होती. लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्याविरोधात अनेक निवडणुका लढवल्या. १९९१ ते १९९९ दरम्यान त्यांनी चार वेळा लोकसभा निवडणूक लढवली. १९९८ मधील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती. तसेच १९९४ ते २००० या कालावधीत त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून काम पाहिले. वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार आणि रेल्वे यांसारख्या महत्त्वाच्या संसदीय समित्यांवर त्यांनी काम केले.

कौटुंबिक माहिती

त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई पाटील, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. त्यांचा मुलगा सच्चिदानंद अमेरिकेत आयटी कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. मुलीही विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ. पाटील यांना वाचन, प्रवास आणि गझलांचा विशेष छंद होता. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, संस्कृत आणि फ्रेंच या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. आयुष्यभर शिकण्याची वृत्ती आणि लोकांशी जुळवून घेण्याची कला यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांना भावले.

आज अंत्यसंस्कार

डॉ. पाटील यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता लातूरमधील संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी “लातूरच्या शैक्षणिक क्रांतीचा महामेरू हरपला,” अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली.

डॉ. गोपाळराव पाटील यांचे आयुष्य हे शिक्षण, समाजसेवा आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत आदर्श ठरणारे होते. त्यांच्या कार्याची परंपरा आणि ‘लातूर पॅटर्न’ हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

हेही वाचा

फडणवीस साहेब, तुम्ही माझं नालंदा विद्यापीठ आहात, तुमच्यासोबत राहिलो तर मला कोणीही अडवू शकत नाही: कृष्णराज महाडिक

शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा

आणखी वाचा

Comments are closed.