वाड्यातील अवैध फटाका कारखान्यात स्फोट; 20 वर्षीय कामगाराचा करूण अंत, परिसरात हळहळ
वाडा तालुक्यातील कोनसई गावात अवैधरित्या सुरू असलेल्या फाटाका कारखान्यात मंगळवारी आग लागली. या आगीत एका 20 वर्षीय कामगाराचा होरपळून मृत्यू झाला. दुर्घटनेत अन्य सहा महिला कामगार जखमी असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी महिलांना उपचारासाठी वाड्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोनसई गावातील वसंत नाईक यांच्या मालकीच्या जागेत शेड उभारून नरेंदर सिंग आणि यादव यांनी काही महिन्यांपूर्वी सुतळी बाँब बनविण्याच्या कारखाना सुरू केला होता. या कारखान्यात मृत भावेश वावर (20) याच्यासह सुमारे 35 महिला रोजंदारीने काम करत होत्या. मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कामगार भावेश वावर हा सुतळी बाँबसाठी लागणाऱ्या दारूचे मिश्रण हाताने तयार करत असतांना अचानक स्फोट झाला. या स्फोटात त्याचे शरीर छिन्नविछिन्न झाले असून जागीच मृत्यू झाला. तर अन्य सहा महिला कामगार जखमी झाल्या आहेत.
जखमी महिलांपैकी मोनिका पडवळे (30) यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मोनिका जाधव (30), जागृती गवते (27), प्रतिभा पवार (30), अर्चना मिसाळ, जयश्री गरळ जखमी असून त्यांच्यावर वाड्यातील एका खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
या कारखान्यात सुतळी बाँब बनवण्यासाठी आवश्यक असलेली रासायनिक दारूचे मिश्रण तयार केले जात असे. मृत कामगार ही दारू तयार करत असे. तर बाजूच्या जागेत अल्पशिक्षित महिला कामगार बाँब बनविण्याकरिता एका डबीत ही दारू भरून सुतळ गुंडळण्याचे काम करत असत. त्यानंतर हे सुतळी बाँब तालुक्यातील आबजे आणि निचोळे येथे पॅकिंगकरिता पाठवले जात असत, अशी माहिती महिला कामगारांनी दिली.
कोनसई येथे सुरू असलेला हा फटाका कारखाना सुरू करताना संबंधित मालकाने कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर परवानगी घेतलेल्या नव्हत्या. फटाके हे स्फोटकांतर्गत येत असल्याने पेसो (पेट्रोलियम अँड एक्स्प्लोसिव सेफ्टी ऑर्गनायझेशन ) विभागाची परवानगी घेत सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असताना संबंधित कारखानदारांनी नियम धाब्यावर बसवून विनापरवाना सुरू केलेला फटाका कारखाना कामगारांच्या जीवावर बेतला.
स्थानिक प्रशासनाचे अपयश
गेल्या चार महिन्यांपासून हा विनापरवाना कारखाना सुरू होता. स्थानिक पोलीस व संबंधित प्रशासनाला याची साधी कल्पना नसणे हे स्थानिक प्रशासनाचे अपयश आहे. तालुक्यात अशा प्रकारचे विनापरवानगीने किती कारखाने सुरू आहेत, याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे स्थानिक जनतेने म्हटले आहे.
Comments are closed.