संरक्षण विभागाचा ₹975 कोटींचा करार

‘टीआरएडब्ल्यूएल’ शस्त्रप्रणालीची खरेदी करणार

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताच्या संरक्षण विभागाने भारताच्याच सार्वजनिक क्षेत्रातील भारत अर्थ मूव्हर्स या कंपनीशी आधुनिक शस्त्रप्रणाली विकत घेण्यासंबंधीचा करार केला आहे. मंगळवारी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा करार 975 कोटी रुपयांचा आहे. तो ‘टीआरएडब्ल्यूएल’ ही प्रणाली विकत घेण्यासाठी करण्यात आला आहे.

ही प्रणाली सैनिकांचे भूसुंगांपासून संरक्षण करते. त्यामुळे भूसुरुंग पेरलेल्या क्षेत्रांमध्येही भारतीय सैनिक, रणगाडे आणि वाहने सुरक्षिपणे वाटचाल करु शकतात. ही प्रणाली भारताच्या टी-72 आणि टी-90 रणगाड्यांसाठी विशेष उपयुक्त आहे. भारताच्या संरक्षण विभागाचे सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

काय आहे ही यंत्रणा

‘टीआरएडब्ल्यूएल’ ही यंत्रणा भारतनिर्मिती असून ती अनेक वैशिष्ट्यांनी युक्त आहे. भूमीमध्ये कोठे सुरुंग पेरलेले आहेत, हे या यंत्रणेच्या माध्यमातून समजते. त्यामुळे रणगाडे आणि सेनेची वाहने अशा सुरुंगयुक्त भूमीतूनही वेगाने आणि सुखरुपपणे हालचाल करु शकतात, किंवा प्रवास करु शकतात. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड आणि इलेक्ट्रो न्यूमॅटिक्स अँड हैड्रॉलिक्स या कंपन्या ही यंत्रणा भारताच्या भूसेनेला पुरविणार आहेत. ही यंत्रणा काही विशिष्ट देशांकडेच सध्या आहे. आता भारताचाही या देशांच्या पंक्तीत समावेश होणार आहे. या यंत्रणेची मागणी भारतीय भूसेनेकडून अनेक वर्षांपूर्वीपासून केली जात होती. तथापि, ते तंत्रज्ञान भारतात विकसीत करण्यात आले नव्हते. आता ही उणीव भरुन निघाली आहे.

लवकरच समाविष्ट होणार

ही प्रणाली अत्याधुनिक आहे. ती वेगाने कार्य करण्यासाठी प्रसिद्ध आहे. भूमीत पेरण्यात आलेले सुरुंग या यंत्रणेच्या माध्यमातून अचूकपणे शोधले जातात. तसेच ते निकामी करण्याचीही या यंत्रणेची क्षमता आहे. ही यंत्रणा समाविष्ट झाल्यानंतर भारताच्या भूसेनेचे सामर्ध्य आणखी वाढणार आहे. तसेच रणभूमीवर भारतीय भूसेनेची वाहने आणि रणगाडे तसेच इतर सामग्री पुरविणारी वाहने सुरक्षित राहणार आहेत, अशी माहिती भारतीय सेनेच्या विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Comments are closed.