पहलगाम हल्ल्याला एक वर्ष
भारताचे दहशतवादविरोधी धोरण अधिक कठोर : पहलगाम हल्ल्याच्या दु:खद, संतापजनक स्मृती आजही सलणाऱ्या
वृत्तसंस्था / नवी दिल्ली, श्रीनगर
जम्मू-काश्मीर येथील पहलगाम या पर्यटन स्थळी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण आणि क्रूर हल्ल्याला आज बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध भारतीय नागरिकांचे प्राण घेण्यात आले होते. दहशतवाद्यांनी या नागरिकांना त्यांचा धर्म विचारुन त्यांची निर्घृण हत्या करत मानवतेला काळीमा फासणारे कृत्य केले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ‘सिंदूर अभियान’ हाती घेऊन या हल्ल्याचा प्रतिशोध घेतला होता. पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 तळ आणि पाकिस्तानी वायुदलाचे 13 तळ भारताच्या वायुदलाने आणि क्षेपणास्त्रांनी नष्ट केले होते. भारताच्या या प्रतिशोधात पाकिस्तानातील असंख्य दहशतवादी ठार झाले. तर पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेची अतोनात हानी झाली. त्या हानीतून आजही तो देश सावरु शकलेला नाही.
आज बुधवारी या घटनेचा प्रथम वर्ष दिवस भारतात दु:खद पार्श्वभूमीवर गांभीर्याने पाळला जाणार आहे. हल्ल्यात प्राणांस मुकलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. या निर्दयी हल्ल्यानंतर भारताने आपल्या दहशतवाद विरोधी धोरणात अधिक कठोरता आणली असून दहशतवादाविरोधात केवळ प्रतिकात्मक नव्हे, तर सक्रिय धोरण अवलंबिले जात असून त्याला यश येत आहे. त्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला आपल्या शस्त्रबळाने तर नमविलेच, तसेच राजकौशल्याच्या मार्गानेही त्या देशाची सर्व बाजूंनी प्रचंड कोंडी केली असल्याचे दिसून येत आहे.
कसा झाला होता हल्ला…
हा हल्ला पाकिस्ताच्या लष्कर ए तोयबा या संघटनेच्या चार दहशतवाद्यांनी केला होता. हे दहशतवादी सीमाभागातील वनप्रदेशातून भारताच्या सीमेत घुसले होते. पहलगाम येथील ‘बैसारण’ या घनदाट खोऱ्यातील पर्यटन स्थळी त्यावेळी अनेक पर्यटक आलेले होते. दहशतवाद्यांनी त्यांच्यातील हिंदू पुरुषांना त्यांचा धर्म विचारुन बाजूला काढले आणि त्यांच्यावर निर्घृण गोळीबार केला गोळीबारासाठी त्यांनी ‘एम 4’ आणि ए.के. 47 गन्सनी जवळून गोळीबार केला. त्यात 26 निरपराध पर्यटकांचा बळी गेला. बळी गेलेल्यांमध्ये 24 हिंदू पुरुष पर्यटक आणि 1 ख्रिश्चन पर्यटक, तसेच एक मुस्लीम खेचर चालक यांचा समावेश होता. हा हल्ला 22 एप्रिल 2025 या दिवशी दुपारी 1 वाजता झाला. देशभर संतापाची लाट उसळली.
सूड घेण्याचा भारताचा निर्धार
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या या अमानुष हल्ल्याचा सूड उगविण्याचा निश्चय भारताने हल्ला होताक्षणीच केला. त्यादृष्टीने सेनादलांनी पूर्ण सज्जता केली. या सूडअभियानाला ‘सिंदूर अभियान’ असे नाव देण्यात आले. कारण, दहशतवाद्यांनी अनेक हिंदू पुरुष पर्यटकांची हत्या त्यांच्या पत्नींसमोरच करून त्यांच्या कपाळीचे कुंकू (सिंदूर) पुसण्याचे महापाप केले होते. त्यामुळे दहशतवादी आणि त्यांना पोसणारा पाकिस्तान यांना धडा शिकविणे हे भारताचे कर्तव्यच होते.
'सिंदूर मोहीम'
पहलगाम हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी भारताच्या सेनादलांनी हा हल्ला झाल्यानंतर साधारणत: 15 दिवसांनी, अर्थात, 7 मेच्या पहाटे पकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर युद्धविमाने आणि भेदक क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने आघात करून हे सर्व तळ उद्ध्वस्त केले. या तळांमध्ये लपलेले असंख्य दहशतवादी आणि दहशतवाद्यांचे प्रशिक्षक भारताच्या या प्रतिशोधात्मक हल्ल्यात ठार झाले. कुख्यात दहशतवादी मसूद अझर यांच्या कुटुंबातील त्याचे 8 जवळचे नातेवाईक ठार झाले. मात्र, तो स्वत: थोडावेळ आधी बाहेर पडल्याने वाचला होता. त्यानंतर भारताची इच्छा हे अभियान थांबविण्याची होती. तथापि, पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे दु:साहस केले. ते त्याच्या चांगलेच अंगाशी आले. कारण भारताने मग पाकिस्तानच्या 13 वायूतळांवर आणि भूतळांवर ब्राम्होस क्षेपणास्त्रांनी हल्ले केले.
पाकिस्तानची आतोनात हानी
भारताच्या कार्यवाहीत पाकिस्तानच्या सामरिक यंत्रणेची मोठी हानी झाली. त्या देशातील सर्वात महत्त्वाचा मानला गेलेला नूरखान वायूतळ पूर्णत: नष्ट झाला. पाकिस्तानची काही युद्धविमानेही बसल्या जागीच निकामी झाली. पाकिस्तानची रडार यंत्रणाच भारताकडून लक्ष्य बनविण्यात आल्याने नष्ट झाली. अनधिकृत वृत्तांच्या अनुसार भारताने पाकिस्तानची अण्वस्त्रे साठविलेल्या ‘किराना’ टेकड्यांनाही लक्ष्य केले. त्यामुळे अखेर पाकिस्तानला नमते घ्यावे लागून भारताला विनवणी करावी लागली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली. मात्र, ‘सिंदूर अभियान’ भारताने थांबविले नसून ते अद्यापही कार्यरत आहे, अशी माहिती देण्यात आली.
पाकिस्तानची जिरविण्यासाठी इतर उपाय
भारताने पाकिस्तानविरोधात केवळ सामरिक नव्हे, तर इतरही अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याही अत्यंत प्रभावी ठरत असून पुढीलप्रमाणे आहेत-
- सिंधू जलवितरण करार स्थगित- पाकिस्तानशी भारताने 1957 मध्ये सिंधू जलवितरण करार केला होता. त्यानुसार भारतातून वाहणाऱ्या सहा नद्यांपैकी 3 नद्यांचे पाणी पूर्णत: पाकिस्तानला मिळत होते. भारताने हा करार स्थगित केला असून पाकिस्तानला जाणारे पाणी अडविण्यासाठी धरण योजनांना मोठा वेग दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानची जलकोंडी झाली. ती भविष्यात अधिक तीव्र होईल.
- भारताच्या धोरणात परिवर्तन- या हल्ल्यानंतर भारताने आपल्या दहशतवाद विरोधी धोरणात परिवर्तन केले. दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होणार नाहीत, हे पाकिस्तानला निक्षून सांगत, त्या देशासमवेतची चर्चा बंद केली. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर हालचाली करण्याची पद्धत सोडून आता भारताने दहशतवादाविरोधात सक्रिय आणि प्रतिबंधात्मक कठोर धोरण अवलंबिले आहे.
- हल्ल्यांना निर्णायक प्रत्युत्तर- यापुढे कोणताही दहशतवादी हल्ला भारतावर झाला, तर केवळ दहशतवाद्यांविरोधातच नव्हे, तर त्याला पोसणाऱ्या देशाविरोधातही कठोर कारवाई केली जाणार आहे. हा संदेश भारताने जगाला स्पष्टपणे दिला आहे. यापुढे कोणताही दहशतवादी हल्ला ही युद्धाची कृती समजली जाईल आणि भारताचे प्रत्युत्तर तशाच प्रकारचे आणि निर्णायक असेल, असे नवे धोरण आहे.
वर्ष पूर्ण होताना…
ड हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला लक्षात राहील असा प्रतिवार
ड हल्ल्यामुळे देशाच्या दहशतवादविरोधाच्या धोरणात आमूलाग्र परिवर्तन
ड भारताचे पाकिस्तानच्या विरोधात अनेक कठोर आणि प्रभावी उपाय
Comments are closed.