रियल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू क्रिकेटमध्ये दाखल! 'या' प्रसिद्ध फ्रॅंचायजीचा भाग
जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉलपटूंपैकी एकाने आता क्रिकेटच्या विश्वात प्रवेश केला आहे. ज्युड बेलिंगहॅमने इंग्लिश फ्रॅंचायजी बर्मिंगहॅम फिनिक्समध्ये गुंतवणूक करत क्रिकेटच्या जगात पदार्पण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रियल माद्रिदचा स्टार मिडफिल्डर बेलिंगहॅमने संघात १.२ टक्के खरेदी केली आहे.
बेलिंगहॅमने खरेदी केलेल्या त्या हिस्स्याची किंमत अंदाजे १० लाख पाउंड किंवा सुमारे १२ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. त्याने ही गुंतवणूक आपल्या शहराच्या क्लबमध्ये केली आहे. अमेरिकन गुंतवणूक कंपनी नाइटहेड कॅपिटलकडे या फ्रॅंचायजीचा आधीच ४९ टक्के हिस्सा आहे, तर यजमान काउंटी वॉरविकशायरकडे आता ५०.४ टक्के हिस्सा आहे. बेलिंगहॅमच्या गुंतवणूकीमुळे शेअर रचनेत थोडा बदल झाला आहे.
बेलिंगहॅमचे बर्मिंगहॅमशी खूप घनिष्ठ नाते आहे. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरूवात बर्मिंगहॅम सिटीच्या अकॅडमीमधून केली. त्याने वयाच्या १६ व्या वरिष्ठ संघात पदार्पण करत इतिहास रचला होता. त्यानंतर तो बोरुसिया डॉर्टमंड आणि २०१३ मध्ये रियल माद्रिदमध्ये सामील झाला. तो क्रिकेटचाही चाहता आहे, हे फार कमी लोकांना माहित आहे.
बेलिंगहॅम आणि क्रिकेटचे नाते
बेलिंगहॅम सुरूवातीच्या काळात वॉर्सेस्टरशायरमधील हॅगली क्रिकेट क्लबकडून क्रिकेट खेळला आहे. तसेच त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला विचारले गेले की जर एका दिवसासाठी दुसऱ्या खेळाडूशी भुमिका बदलण्याची संधी मिळाली तर तो कोणाला निवडणार? यावर त्याने बेन स्टोक्सचे नाव घेतले. सध्यातरी त्याच्या या गुंतवणूकीबाबत वॉरविकशायरने कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही, मात्र २२ एप्रिलला बेलिंगहॅमच्या गुंतवणूकीची पुष्टी होण्याची शक्यता आहे.
बर्मिंगहॅम फिनिक्सने द हंड्रेडच्या पुरुष किंवा महिला गटात एकही विजेतेपद जिंकलेले नाही. मागील हंगामात संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. तसेच यंदाच्या हंगामात पुरुष संघाचे कर्णधारपद जेकब बेथेल आणि महिला संघाचे नेतृत्व एलिस पेरी करणार आहे. बेलिंगघमच्या गुंतवणूकीची लवकरच घोषणा केली जाणार आहे. त्याच्या प्रवेशामुळे फ्रॅंचायजीला एक नवी ओळख मिळेल.
Comments are closed.