रिषभ पंतसह लखनौचे चार जण भोपळा फोडण्यात अपयशी, राजस्थानकडून लखनौचा 40 धावांनी पराभव
आयपीएल २०२६ एलएसजी विरुद्ध आरआर लखनौ : आयपीएलमध्ये आज लखनौ सुपर जायंटस आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने आलेधा होते. राजस्थान रॉयल्सनं लखनौ सुपर जायंटसला पराभूत केलं आहे. लखनौ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण त्या निर्णयाचा त्यांना फायदा घेता आला नाही. राजस्थान रॉयल्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 6 बाद 159 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौच्या फलंदाजांना अपयश आलं. एकमेव मिशेल मार्श यानं 55 धावा केल्या. तर, राजस्थानकडून सर्वाधिक 43 धावा रवींद्र जडेजा यानं केल्या. आज जडेजानं गोलंदाजी मध्ये देखील दमदार कामगिरी केली. लखनौचा संघ 119 धावांवर बाद झाला. राजस्थान रॉयल्सनं लखनौवर 40 धावांनी विजय मिळवला. या विजयासह राजस्थाननं यंदाच्या हंगामातील पाचवा विजय मिळवत 10 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
जडेजाची दमदार कामगिरी
राजस्थानच्या डावाची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी मिळून 32 धावांची सलामीची भागीदारी केली. मोहम्मद शमीनं यशस्वी जयस्वाल याला 22 धावांवर बाद केलं तर ध्रुव जुरेल शुन्यावर बाद झाला. वैभव सूर्यवंशी 8 धावा करुन बाद झाला. यानंतर रियान पराग यानं 20, हेटमायर यानं 22 धावा केल्या. तर, रवींद्र जडेजा 43 धावा करुन नाबाद राहिला. डी. फेरारिया यानं 20 आणि दुबेनं 19 धावा केल्या. यामुळं राजस्थानचा संघ 20 ओव्हरमध्ये 6 बाद 159 धावा करु शकला. या धावसंख्येचा पाठलाग करण्याचं आव्हान लखनौसमोर होतं.
लखनौच्या फलंदाजांचा फ्लॉप शो, मार्शची एकाकी झुंज
लखनौ सुपर जायंटसच्या फलंदाजांनी घरच्या मैदानावर निराशा केली. लखनौकडून केवळ मिशेल मार्श यानं 41 बॉलमध्ये 55 धावा केल्या. यानंतर निकोलस पूरन यानं 22 धावा केल्या. हिम्मत सिंग यानं 15 धावा केल्या. लखनौचे इतर फलंदाज दोन अंकी धावसंख्या गाठू शकले नाहीत. मुकूल चौधरी यानं 7, मोहम्मद शमी यानं 6 आणि दिग्वेश राठीनं 2 धावा केल्या. तर मोहसीन खान, आयुष बदोनी, रिषभ पंत आणि एडन मार्करम या चार खेळाडूंना खातं उघडता आलं नाही. यामुळं लखनौचा संघ 119 धावांवर बाद झाला.
लखनौ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे तर राजस्थान रॉयल्सनं गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, आयुष बडोनी, ऋषभ पंत (विकेटकीपर), निकोलस पूरन, एडन मार्कराम, मुकुल चौधरी, मोहम्मद शमी, मोहसीन खान, प्रिन्स यादव, दिग्वेश सिंग राठी, मयंक यादव.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रायन पराग (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, ब्रिजेश शर्मा, नांद्रे बर्जर.
आणखी वाचा
Comments are closed.