MI vs CSK: वानखेडेवर रंगणार मुंबई विरुद्ध चेन्नई महामुकाबला! पहा आजवरचा हेड टू हेड रेकॉर्ड काय सांगतो?

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19 व्या हंगामामध्ये आतापर्यंत 5-5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स (MI and CSK) आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांची कामगिरी मैदानावर फारशी खास राहिलेली नाही. तरीदेखील, या दोन्ही संघांमधील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 23 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात हा सामना रंगणार आहे. हा महत्त्वाचा सामना मुंबई इंडियन्सचे घरचे मैदान असलेल्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.

मुंबई इंडियन्सने या आयपीएल हंगामात आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, ज्यापैकी केवळ 2 सामन्यांत त्यांना विजय मिळवता आला असून 4 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नई सुपर किंग्सची स्थितीही काहीशी अशीच आहे; त्यांनीही 6 सामने खेळून केवळ 2 जिंकले आहेत, तर 4 सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील रेकॉर्ड पाहिल्यास मुंबईचे पारडे थोडे जड वाटते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 39 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने 21 सामने जिंकले आहेत, तर चेन्नई सुपर किंग्सला 18 सामन्यांत विजय मिळवता आला आहे. मात्र, दोन्ही संघांमधील गेल्या 5 सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला तर त्यात चेन्नई सुपर किंग्सचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. गेल्या 5 पैकी 4 सामने चेन्नईने जिंकले आहेत, तर मुंबईला केवळ 1 सामना जिंकता आला आहे. अशा स्थितीत मुंबई इंडियन्ससाठी हा सामना अजिबात सोपा नसेल.

मुंबई आणि चेन्नई दरम्यान वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर येथेही मुंबईचे पारडे जड दिसते. या मैदानावर दोन्ही संघांमध्ये एकूण 13 सामने झाले असून, मुंबई इंडियन्सने 8 सामने जिंकले आहेत, तर चेन्नई सुपर किंग्सने 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. परंतु, या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सची घरच्या मैदानावरील कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यांनी वानखेडेवर आतापर्यंत 3 सामने खेळले असून त्यापैकी 2 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Comments are closed.