वर्ल्ड कपमधला पहिला मोठा धक्का; दिग्गज जर्मनीला पराभवाचा हादरा, इक्वाडोर ऐतिहासिक विजयासह बाद फेरीत

यंदाच्या वर्ल्ड कपमधला सर्वात मोठा धक्का शुक्रवारी पहाटे चाहत्यांना बसला. तब्बल चारवेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या आणि यंदा फेव्हरेट समजल्या जाणाऱ्या जर्मनीला मोठा हादरा बसला. आतापर्यंत एकही सामना न जिंकणाऱ्या इक्वाडोरने थेट जर्मनीला पाणी पाजले आणि स्पर्धेत मोठा फेरबदल घडवला. इक्वाडोरने उत्कृष्ट कामगिरी जर्मनीला 2-1 ने पराभूत केले आणि बाद फेरी गाठली.

जर्मनीला सुरुवातीलाच आघाडी

सामन्याच्या सुरुवातीपासूनच जर्मन आक्रमक खेळले. सामन्याच्या दुसऱया मिनिटातच जर्मनीने 1-0 अशी आघाडी घेतली. लेरॉय सानेने संघासाठी गोल केला. विर्ट्झच्या पासचा फायदा घेत सानेने पेनल्टी एरियामधून एक शानदार शॉट मारला, जो गोलजाळ्यात गेला. त्यामुळे जर्मनीने झोकात सुरुवात केली होती.

इक्वाडोरचे दमदार कमबॅक

इक्वाडोरने पिछाडीवरून जोरदार पुनरागमन करत नवव्या मिनिटाला 1-1 अशी बरोबरी साधली. नील्सन अँगुलोने लांबून एक शानदार शॉट मारून गोल केला. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु पहिल्या हाफच्या अखेरपर्यंत कोणालाही यश आले नाही.

इक्वाडोरचा विजयी गोल

दुसऱया सत्रामध्ये इक्वाडोर जर्मनीपेक्षा अधिक आक्रमक खेळला आणि चार वेळच्या चॅम्पियन संघाच्या बचावावर सतत दबाव टाकत होता. 77 व्या मिनिटाला गोंझालो प्लाटाने एक शानदार गोल करून संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. उजव्या विंगवरून मिळालेल्या कॉर्नर किकचा फायदा घेत गोंझालोने एका उत्कृष्ट शॉटद्वारे सामन्यातील आपला पहिला गोल केला.

इक्वाडोरचा पहिलाच विजय

इक्वाडोरसाठी हा प्रवास सोपा नव्हता. पहिल्या सामन्यात संघ आयव्हरी कोस्टकडून 0-1 फरकाने हरला होता, तर कुरासावविरुद्धचा दुसरा सामना गोलशून्य बरोबरीत संपला होता. पण जर्मनीने आधीच नॉकआऊट फेरीसाठी पात्रता मिळवली होती आणि ते विजयाचे प्रबळ दावेदार होते.

इतिहासात दुसऱयांदा ही कामगिरी साधली

फुटबॉलच्या इतिहासात इक्वडोरच्या संघाने विश्वचषकाच्या गट फेरीतून बाद फेरीपर्यंत मजल मारण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. यापूर्वी संघाने 2006 मध्ये ही कामगिरी केली होती.

अंतिम मिनिटांचा चित्तथरारक थरार

इक्वाडोरने 2-1 अशी आघाडी घेतल्यानंतर संघ पूर्णपणे बचावात्मक पवित्र्यात गेला. सामन्याच्या अंतिम क्षणांमध्ये आणि सात मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत जर्मनीने बरोबरी साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु इक्वाडोरच्या बचावाने जर्मनीचे प्रत्येक आक्रमण रोखून धरले. अखेरीस अंतिम शिट्टी वाजताच इक्वाडोरच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Comments are closed.