अभिषेक शर्माचा विश्वविक्रम! जगात असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज
भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना बेलफास्ट येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला पहिल्या सामन्यात 34 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात भारतावर आयर्लंडचा हा पहिलाच विजय ठरला.
प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाने 9 बाद 182 धावा केल्या, तर प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 148 धावाच करू शकला. अभिषेक शर्माने अवघ्या 19 चेंडूंत अर्धशतक झळकावून भारताला धडाकेबाज सुरुवात करून दिली. मात्र, इतर फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याने भारताचा पराभव झाला. या शानदार कामगिरीसह अभिषेक शर्माने विश्वविक्रम प्रस्थापित केला.
20 पेक्षा कमी चेंडूंत सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय अर्धशतके ठोकणारा फलंदाज म्हणून अभिषेक शर्माने विक्रम नोंदवला आहे. त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 20 पेक्षा कमी चेंडूंत अर्धशतक गाठण्याची ही चौथी वेळ आहे. जो एक विश्वविक्रम आहे. या यादीत न्यूझीलंडचे कॉलिन मुनरो आणि फिन ॲलन यांचाही समावेश आहे. ज्यांनी प्रत्येकी तीन वेळा ही कामगिरी केली आहे. परंतु अभिषेक शर्मा असे चार वेळा करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी, अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्ध 14 आणि 18 चेंडूंत, तसेच इंग्लंडविरुद्ध 17 चेंडूंत अर्धशतके झळकावली होती. आता त्याने 19 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून या यादीत आणखी एका कामगिरीची भर घातली.
20 पेक्षा कमी चेंडूंत सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय अर्धशतके
४ – अभिषेक शर्मा*
3 – कॉलिन मुनरो
3 – फिन ऍलन
याव्यतिरिक्त, 250 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटसह 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याच्या बाबतीत अभिषेक शर्मा भारताचा अव्वल फलंदाज ठरला आहे. त्याने ही कामगिरी तीन वेळा केली आहे, तर माजी कर्णधार सूर्यकुमार यादव या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
टी20 मध्ये 250च्या स्ट्राईक रेटसह भारतासाठी सर्वाधिक 50+ धावांच्या खेळी
३ – अभिषेक शर्मा*
२ – सूर्यकुमार यादव
१ – युवराज सिंग
१ – केएल राहुल
१ – रोहित शर्मा
१ – शिवम दुबे
१- इशान किशन
१ – हार्दिक पांड्या
1 – टिळक वर्मा
183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर संपूर्ण संघ कोलमडला. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर एकेरी धावसंख्येवर बाद झाले. अभिषेकनंतर, शिवम दुबे 25 धावांसह संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या दोघांशिवाय इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला 20 धावांचा टप्पा गाठता आला नाही.
Comments are closed.