IRE vs IND: 'या' 5 खेळाडूंमुळे भारताचा पहिल्या टी 20 मध्ये मानहानीकारक पराभव, त्यापैकी एक पुढील सामन्यातून बाहेर…

सध्या भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. शुक्रवारी (२६ जून) झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचा पराभवाचा सामना करावा लागला. आंतरराष्ट्रीय सामन्यात आयर्लंडने भारताला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ होती. या सामन्यात नेतृत्वात पदार्पण करणाऱ्या भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यजमानांनी लॉर्कन टकरच्या ५० धावा आणि गॅरेश डेलानीच्या ४९ धावांच्या जोरावर २० षटकांत १८२ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात भारताचा संघ १८.५ षटकांत १४८ धावसंख्येवरच गारद झाला. यामध्ये भारताच्या पराभवास कोण कारणीभूत, याविषयी जाणून घेऊ.

प्रसिध कृष्णा – या सामन्यात भारताकडून सर्वाधिक निराशाजनक कामगिरी वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ५७ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यामधील एका षटकात तर त्याने २७ धावा दिल्या. त्याने जर आपल्या गोलंदाजीच्या टप्प्यावर आणि दिशेवर नियंत्रण ठेवले असते तर आयर्लंडच्या धावसंख्येला जरासा ब्रेक लागला असता.

श्रेयस अय्यर – कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात श्रेयस प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. त्याने गोलंदाजी विभागात वॉशिंग्टन सुंदर आणि प्रसिद यांचा अतिवापर केला. त्याचा हाच निर्णय अंगलट आल्याचे दिसले. तसेच तो फलंदाजी करताना ७ चेंडूंमध्ये केवळ ३ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधारपदाला साजेशी कामगिरी तो करू शकला नाही.

इशान किशन – उत्तम फॉर्ममध्ये असूनही इशान या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही. संजू सॅमसन लवकर बाद झाल्यानंतर तो अभिषेक शर्मासोबत डाव सावरण्यास मदत करेल असे वाटत असताना एक खराब शॉट खेळत त्याने आपली विकेट गमावली. त्याच्या बाद होण्याने भारतावरील दबाव आणखी वाढला.

तिलक वर्मा – टी२० संघाचा उपकर्णधार तिलकही प्रभावी कामगिरी करू शकला नाही. दबावाखाली उत्तम फलंदाजी करणाऱ्या या खेळाडूने आयर्लंडविरुद्ध २१ चेंडूंमध्ये केवळ १९ धावा केल्या. तसेच तो रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात सोपा झेल देत बाद झाला.

वॉशिंग्टन सुंदर – अष्टपैलू म्हणून सुंदरने पूर्णपणे निराशा केली. त्याने गोलंदाजी करताना एका षटकांत १९ धावा दिल्या. तसेच फलंदाजीवेळी १२ चेंडूंमध्ये केवळ ९ धावा केल्या. त्याच्या या निराशाजनक कामगिरीमुळे त्याला पुढील सामन्यासाठीच्या अंतिम ११ मधून वगळण्याची शक्यता आहे.

Comments are closed.