सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’चे रसग्रहण, आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम
जागतिक कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज गुरुवार, 23 एप्रिल रोजी संध्याकाळी 6.30 वाजता प्रभात चित्र मंडळ आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पटकथा लेखिका मनीषा कोरडे या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटाचे रसग्रहण सादर करणार आहेत. हा कार्यक्रम नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या तळमजल्यावरील ऋणानुबंध सभागृहात होईल.
संजीव पुमार, शबाना आझमी, सईद जाफरी आणि अमजद खान यांच्या अभिनयाने नटलेला ‘शतरंज के खिलाडी’ हा सत्यजित रे यांचा महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. या चित्रपटाविषयीच्या आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या खास आठवणी कार्यक्रमात जागवणार आहेत. त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. मनीषा कोरडे यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या अनेक चित्रपटांसाठी पटकथा आणि संवाद लेखनाचे काम केले आहे. त्यात ‘भुल भुलैया’, ‘मालामाल वीकली’, ‘ढोल’, ‘बिल्लू’, ‘मोरो बाप पहले आप’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच त्या स्क्रीनरायटर्स असोसिएशनच्या व्हाईस प्रेसिडंट आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.
Comments are closed.