Nanded News – हडसणी फाट्यावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह चार जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हदगाव तालुक्यातील हडसणी फाटा येथे बुधवारी (22 एप्रिल 2026) रात्री साडेनऊच्या सुमारास कार आणि दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण उपचारादरम्यान दगावला. भरधाव कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात रेखाबाई भाऊराव नरवाडे (42), त्यांचा मुलगा यशवंत भाऊराव नरवाडे (23, दोघे रा. निवघाबाजार) आणि रेखाबाईंची नणंद अनुसया बालाजी लोणारे (रा. दरेगाववाडी, ता. मुदखेड) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील जखमींना तातडीने नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

घटनेची माहिती मिळताच हदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान, या अपघातामुळे संतप्त झालेल्या हडसणी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. “हडसणी फाटा हा मृत्यूचा सापळा बनला असून येथे वारंवार अपघात होत आहेत,” असा आरोप करत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला. या ठिकाणी तातडीने गतिरोधक, रेडियम इंडिकेटर्स आणि हायमास्ट लाईट बसवावेत, तसेच रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

Comments are closed.