लग्न जमायला अडचण, कुंडात अंघोळ अन् झाडाला फेऱ्या, भेटायला बोलावून भोंदू महेशगिरीचं धक्कादायक कृ

नाशिक क्राईम न्यूज : नाशिक (Nashik) जिल्ह्यात भोंदूगिरीच्या घटनांचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच, आता निफाड तालुक्यातील धरणगाव (खडक) येथील एका स्वयंघोषित बाबाचे संतापजनक कृत्य समोर आले आहे. महेशगिरी (Maheshgiri) उर्फ महेश दिलीप काकडे याने ‘बाहेरची बाधा’ उतरवण्याच्या बहाण्याने एका पीडित महिलेचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात (Lasalgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणातील पीडित महिलेने आपबिती सांगितली आहे.

पीडित महिला म्हणाली की, लग्न जमायला अडचण आणि माझी जास्त चिडचिड होत होती, म्हणून मला 15 ऑगस्ट 2024 मध्ये माझ्या घरच्यांनी या भोंदूबाबाच्या मठात नेलं होतं. माझ्या आई-वडिलांसोबत मी मठात गेली आणि त्या ठिकाणी या बाबाने मला सांगितलं की, तुला बाहेरची बाधा झाली आहे. मला चार गुरुवार मठात येऊन पूजा करायला सांगितले. पापनाशक कुंडात अंघोळ करून औदुंबर झाडाला फेरा मारायला सांगण्यात आले. नंतर या बाबाने माझा मोबाईल नंबर मागितला आणि व्हॉट्सॲपवर जन्मतारीख विचारली.  त्यानंतर हा बाबा मला मेसेज करत होता.

Nashik Crime News: मला एकांतात बोलावलं, अन्…

तू मला आवडते, तू माझ्या पुण्याच्या मठाचं काम बघ, असं त्याने मला सांगितलं. त्यानंतर माझ्या घरच्यांना सांगून मला एकांतात बोलावलं. मी नाशिकला त्या बाबाला भेटायला आली. या बाबाने नाशिकच्या पंचवटीत मला भेटून मला त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेले. मला त्याची काहीच माहिती नव्हती, पण मला नंतर समजले की हा बाबा माझ्यासोबत काय करणार आहे. मी त्या बाबास प्रतिकार करू शकले नाही. मला तो धमकी देत होता. माझा जीव घेईल, अशी मला भीती दाखवली म्हणून मी सर्व सहन केले, असे त्या महिलेने म्हटले.

Nashik Crime News: माझं कोणी काही करू शकत नाही, भोंदूबाबाची धमकी

पीडित महिला पुढे म्हणाली की, या बाबाने माझ्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिथून मला पुन्हा नाशिकला सोडून दिले. नंतर त्या बाबाने मला सांगितलं, माझं कोणी काही करू शकत नाही आणि हे सर्व सहन करून मी घरी गेल्यानंतर माझ्या मनात जीव देण्याचा विचार आला. मी घडलेला प्रकार घरी सांगितला आणि आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो. मात्र, आमची कोणीही दखल घेतली नाही. त्यानंतर मी आणि माझा नवरा काही दिवस न्यायाच्या प्रतीक्षेत होतो. नंतर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे मदतीसाठी गेलो. आडगाव पोलीस ठाण्यात हा प्रकार सांगितला. मात्र, त्यांनी सांगितले हे प्रकरण ग्रामीण भागातले आहे. मग मी पुन्हा दिंडोरी पोलीस ठाण्यात गेले.

Nashik Crime News: भोंदूबाबाला लवकरात लवकर अटक करावी

दिंडोरी पोलीस ठाण्यात मी काही पुरावे दिले. पोलिसांनी मला सांगितले या बाबाचे आणि तुझे मैत्रीचे संबंध होते. त्यातून हे झालं. यात आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्यासाठी मला मदत केली. या बाबाने अनेक असे महिलांना त्याच्या जाळ्यात उडून त्यांचे लैंगिक अत्याचार केले आहे.  ज्यांच्यासोबत असं घडलं अशा तरुणींना मी समोर येण्याची विनंती करते. हा प्रकार खूप भयानक आहे. या भोंदू बाबावर कारवाई झाली. मात्र, त्याला लवकर अटक करावी आणि त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि मला न्याय मिळावा, अशी माझी अपेक्षा आहे. या बाबाच्या मठात अनेक राजकीय लोकं, मोठे डॉक्टर आणि इतर अधिकारी लोक येत होते, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा

Ashok Kharat Crime News: अशोक खरात प्रकरणात ‘डॉक्टर’ कनेक्शन! महिलांच्या गर्भपातासाठी बड्या डॉक्टरांनी पुरवल्या गोळ्या? SIT तपासात खळबळजनक माहिती

आणखी वाचा

Comments are closed.