Ratnagiri News – 13 वर्षांच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 20 वर्षे सक्तमजुरी; चिपळूण विशेष न्यायालयाचा निकाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चिपळूनमध्ये 13 वर्षांच्या शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वैभव सुरेश पालशेतकर (वय 37, रा. चिपळूण) या नराधमाला चिपळूण येथील विशेष न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी 20 वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त एक वर्ष सक्तमजुरी भोगावी लागणार असून, दंडाची ही रक्कम पीडितेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

ही धक्कादायक घटना मार्च 2019 मध्ये घडली होती. पीडित मुलगी सायंकाळच्या सुमारास साखर आणण्यासाठी जात असताना आरोपी वैभव पालशेतकर याने तिला एका निर्जन ठिकाणी गाठले. तिला जबरदस्तीने गवतात नेऊन तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. यानंतर, ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या मुलीने सुरुवातीला कोणाकडेही वाच्यता केली नाही.

मात्र, जुलै 2019 मध्ये मुलीच्या आईला तिच्या प्रकृतीबाबत संशय आल्याने त्यांनी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मुंबईतील अश्विनी रुग्णालयात केलेल्या सोनोग्राफीमध्ये मुलगी 19 आठवड्यांची गरोदर असल्याचे समोर आले. आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता, पीडित मुलीने आरोपीच्या अत्याचाराची भयावह घटना कथन केली.

पीडितेच्या आईने तात्काळ मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. गुन्हा चिपळूणच्या हद्दीत घडल्याने तपास चिपळूण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी सखोल तपास करून आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम 376 (3), 506 आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांन्वये दोषारोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले.

या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अनुपमा ठाकूर यांनी प्रभावी युक्तिवाद करत एकूण 14 साक्षीदार तपासले. पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. न्यायव्यवस्थेने दिलेल्या या निकालामुळे पीडितेच्या कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

Comments are closed.