भाजप-शिंदे गटात तू तू मैं मैं; नगराध्यक्षा प्रणिता भालके टक्केवारी घेतात, आमदार समाधान आवताडे यांचा आरोप

सार्वजनिक उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यावरुन भाजपाचे आजीमाजी आमदार आणि मिधे सेनेच्या नगराध्यक्षा यांच्यातील राजकीय वाद एकमेकांच्या कुटुंबाची उणीदुनी काढण्यापर्यंत पोहचला आहे. रखडलेली विकासकामे आणि झालेल्या कामाची गुणवत्ता यावर दोन्ही नेतृत्वाने अधिक लक्ष देणे अपेक्षित असताना. दोन्ही सत्ताधारी पक्ष एकमेकांवर टक्केवारी खाता असा बेधडक आरोप करु लागल्याने, यांना उगाच निवडून दिले असा पश्चात्ताप मतदार होऊ लागला आहे.

पंढरपूर नगरपरिषदेवर जवळपास चार दशके माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाची एकहाती सत्ता होती. भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराने त्रस्त झालेल्या मतदारांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत परिचारिकांच्या नेतृत्वाला डावलून नगराध्यक्षापदी प्रणिता भालके यांना संधी दिली.

भालके या उच्च शिक्षित आहेतच शिवाय त्यांना राजकारण, समाजकारण अन् सार्वजनिक विकास कामांचा अभ्यास असल्याने, शहराच्या विकासाला चालना मिळेल अशी जनभावना होती. मात्र भालके विकास कामांची टक्केवारी घेत असल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी जाहीरपणे केल्याने, मतदार राजा संभ्रमित झाला आहे.

तथापि भालके यांनी या आरोपाला पत्रकार परिषद घेऊन  टक्केवारीचे आरोप फेटाळून लावले आहेत. आमदार आवताडे हे कॉन्ट्रॅक्टर आहेत टक्केवारी कशी घेतली जाते कशी दिली जाते याचा अभ्यास त्यांना दांडगा आहे. त्यांनी आमदारकी सुद्धा टक्केवारी देऊन मिळविली असल्याचा प्रति टोला भालके यांनी लगावला आहे.

पंढरपूरच्या जनतेने सत्तेचा कौल विचित्रच दिला आहे. नगराध्यक्षापदी भालके आणि नगरसेवकांचे बहुमत परिचारक गटाचे म्हणजे 12 नगरसेवक भालकेंचे आणि 24 नगरसेवक परिचारक गटाचे नगरपरिषदेत पूर्ण सत्तांतर झाले नसल्याने, नगरसेवकांच्या पाशवी बहुमतावर परिचारक गटाने भालकेंची राजकीय कोंडी केली आहे.

भालके यांनी नगराध्यक्षा पदाचा पदभार घेतल्यापासून सभा आणि बैठकांमध्ये वादविवाद सुरु आहेत. वादाला दोन्हीकडून विषय मिळत असल्याने, विकासाचे मुद्दे बाजूला पडले आहेत.

काल परवा तर नगराध्यक्षांना निमंत्रण न देता नगरपरिषदेच्या राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाचे परिचारक गटाच्या नगरसेवकांनी परस्पर लोकार्पण केले यावेळी भाजपचे आ.आवताडे व माजी आ. परिचारक यांची उपस्थिती होती.

भालकेंनी या कार्यक्रमाबाबत पोलिसांत धाव घेऊन कार्यक्रम थांबविण्याची तक्रार केली होती.

यावर परिचारक गटाचे नगरसेवक व उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांनी भालके यांना विश्वासात घेऊन लोकार्पण सोहळ्याचे नियोजन केले होते. मात्र त्या सोहळ्याला आल्या नसल्याने आम्ही लोकहितासाठी कार्यक्रम उरकून घेतल्याचा खुलासा केला आहे.

भालके कडून पंढरपूरकरांच्या खूप अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या असतील तर त्यांना प्रथम टक्केवारीचा आरोप खोडून काढावा लागेल. त्यासाठी भ्रष्टाचार विरहित आणि पारदर्शक कारभार करावा लागणार आहे.

भालकेकडे नेतृत्वाचे आणि वक्तृत्वाचे चांगले गुण आहेत, त्याला स्वच्छ कारभाराची जोड दिली तर, विरोधी बाकावर बसलेल्या नगरसेवकांना आपलेसे करुन घेणे शक्य आहे. राज्यात भाजप आणि शिंदेंची गट सत्तेत आहे. भालकेंनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. प्रशांत परिचारक हे भाजपचे माजी आमदार आहेत. राज्याच्या सत्तेत एकत्र असताना देखील भाजपच्या आजीमाजी आमदारांनी भालकेंना राजकीय कोंडीत पकडले आहे. आमदार आवताडे यांनी भालके ठेकेदाराकडून टक्केवारी घेत असल्याचा उघड आरोप करीत आहेत. तर माजी आमदार परिचारक भ्रष्ट कारभार रोखण्यासाठी विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचे सुचवत आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधी सत्तेत असलेल्या मित्र पक्षाच्या महिला नगराध्यक्षावर जाहीरपणे आरोप करीत असतील तर भालकेंनी या आरोपाचे आत्मचिंतन करुन कारभारात सुधारणा करणे अपेक्षित आहे.

पंढरपूर हे देशातील पवित्र आणि प्रमुख तीर्थस्थळ आहे, हे क्षेत्र जगाच्या नकाशावर आणण्यासाठी पंढरपूर मध्ये कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे. हजारो कोटी रुपयांचा निधी इथे दिला जाणार आहे. या निधीतून पंढरपूर शहराचा विकास आणि वारकऱ्यांना मूलभूत सेवा सुविधा देण्याचा केंद्र आणि राज्य शासनाचा मनोदय आहे. पंढरपूरच्या जनतेने भविष्याचा वेध लक्षात घेऊन सत्तांतर घडवून आणले आहे. ते रस्ते, धूळ, स्वच्छ पाणी, प्रसन्न वाळवंट, भव्य पार्किंग, विशाल भक्त निवास आदी मार्गी लावाल यासाठी तुमच्या कडून जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मोठ्या विश्वासाने मतदारांनी तुम्हाला नगराध्यक्षा पदी विराजमान केले आहे. तुमच्या वरील टक्केवारीच्या आरोपात किती तथ्य ते यथावकाश समोर येईल. तूर्तास तुमच्या आर्थिक लाभासाठी मतदारांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची दक्षता तुम्हाला काळजीपूर्वक घ्यायला हवी.

Comments are closed.