IPL 2026: विराट कोहलीला वर्ल्ड कप जिंकून दिला, नंतर बनला आयकर अधिकारी! आता करतोय अंपायरिंग

भारतीय क्रिकेटपटूंच्या जीवनाविषयीच्या गोष्टी खूपच लक्ष वेधून घेतात. काही खेळाडू लहान वयातच कठोर मेहनत करून पुढे स्टार बनतात, तर काही जण क्रिकेटशी कोणत्या ना कोणत्या नात्याने जोडलेले असतात. अशीच एक चकित करणारी माहिती आता समोर आली आहे. ज्याने २००८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषकात उत्तम कामगिरी केली होती, आता त्याने आयपीएल २०२६ च्या हंगामात पंच म्हणून मैदानात पदार्पण केले आहे.

आयपीएल २०२६ मध्ये ३२ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. यामध्ये अजितेश अर्गल याने पंच म्हणून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने २००८ च्या विश्वचषकात भारताच्या विजयात महत्त्वाची भुमिका बजावली होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पावसामुळे बाधित झालेल्या त्या सामन्यात त्याने पाच षटकात केवळ ७ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या प्रभावी कामगिरीमुळे भारताला १६० या छोट्या लक्ष्याचा बचाव करण्यात आणि विश्वचषक जिंकण्यात खूप मदत झाली. त्याला या कामगिरीबद्दल सामनावीर पुरस्कारही मिळाला होता. त्याने पीटर मलान आणि रायली रुसो या वरच्या फळीच्या फलंदाजांना बाद केले होते.

अजितेशला आयपीएलच्या पहिल्या हंगामात पंजाब किंग्जने विकत घेतले होते, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच तो बडोदा संघाकडून देशांतर्गत सामनेही काही मोजकेच खेळला आहे. क्रिकेटमध्ये फारसे यश न मिळाल्याने त्याने क्रीडा कोट्यातून आयकर विभागात नोकरी केली आणि क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अनेक वर्ष सरकारी नोकरी करूनही क्रिकेटची आवड त्याच्यात कायम होती.

अजितेशने २०२३ मध्ये बीसीसीआयच्या पंचगिरीची परिक्षा पास केली. त्याने देशांतर्गत क्रिकेट आणि महिला प्रीमियर लीगमध्ये पंचाचा अनुभव घेतला. आता तो आयपीएलमध्ये पोहोचला आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत १० प्रथम श्रेणी, ३ लिस्ट ए आणि ६ टी२० सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणीत २४ विकेट्स, लिस्ट ए मध्ये १ आणि टी२० मध्ये ४ विकेट्स घेतल्या आहेत.

Comments are closed.