MLA Cup Kabaddi Tournament – थरारक सामन्यात आयएसपीएलने जिंकले अजिंक्यपद; बीपीसीएलचा हिशेब केला चुकता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रभादेवी येथील स्पर्धेत चार दिवसांपूर्वी झालेल्या पराभवाचा बदला घेत आयएसपीएल (इन्शुअरकोट स्पोर्ट्स) संघाने आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या जेतेपदावर आपले नाव कोरले. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आमदार सुनील राऊत यांनी विक्रोळीत आयोजित केलेल्या या स्पर्धेत आयएसपीएलने बीपीसीएलचा हिशेब चुकता केला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात पाच-पाच चढायांच्या थरारात आयएसपीएलने ९-४ (४६-४१) अशा फरकाने विजय मिळवून हंगामातील चौथे जेतेपद पटकावले.

विक्रोळी पूर्व येथील टागोर नगरमधील डॉ. आंबेडकर उद्यानात उभारलेल्या क्रीडानगरीत या कबड्डी महोत्सवाचा समारोप रोमहर्षक ठरला. पुरुषांच्या व्यावसायिक गटात अंतिम लढत कमालीची रंगतदार झाली. सामन्याच्या सुरुवातीला नीरज मिसाळ आणि राकेश खटकर यांच्या धडाकेबाज चढायांच्या जोरावर आयएसपीएलने १०-३ अशी भक्कम आघाडी घेतली होती. मध्यंतरापर्यंत ही आघाडी २१-१३ अशी होती. उत्तरार्धातही आयएसपीएलने आपले वर्चस्व कायम राखले होते, मात्र शेवटच्या पाच मिनिटांत बीपीसीएलच्या मिलन दहियाने वादळी खेळ करत सामन्याचे चित्र पालटले. १९-३३ अशा मोठ्या पिछाडीवर असलेल्या बीपीसीएलने आयएसपीएलच्या बचावात्मक खेळाचा फायदा उठवत ३७-३७ अशी बरोबरी साधली आणि सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढवले.

सामना बरोबरीत सुटल्याने पाच-पाच चढायांचा नियम लागू करण्यात आला. या निर्णायक टप्प्यावर आयएसपीएलने मागील चुका टाळत चतुरस्त्र खेळ केला. त्यांनी बीपीसीएलच्या चढाईपटूंना रोखण्यात यश मिळवले आणि ९-४ अशा फरकाने बाजी मारली. या विजयासह आयएसपीएलने राष्ट्रीय मिल मजदूर संघ, अमरावती आणि वाशिम येथील स्पर्धांनंतर या हंगामातील चौथे जेतेपद मिळवले.

स्पर्धेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल आयएसपीएलच्या नीरज मिसाळला ‘सर्वोत्तम खेळाडू’ म्हणून गौरवण्यात आले आणि त्याला आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते दुचाकी भेट देण्यात आली. बीपीसीएलचा मिलन दहिया ‘सर्वोत्तम चढाईवीर’, तर सीजीएसटीचा साईप्रसाद पाटील ‘सर्वोत्तम पकडपटू’ ठरला. विजेत्या आयएसपीएल संघाला चषक आणि दोन लाख रुपये, तर उपविजेत्या बीपीसीएलला दीड लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. या सोहळ्याला माजी आमदार रमेश कोरगावकर, अमोल कीर्तीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed.