रोहित-विराट नंतर आता संजू सॅमसन, अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय फलंदाज!

आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून चेन्नईला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. या आमंत्रणाचा स्वीकार करून चेन्नईच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. एका बाजूने विकेट्स जात होते, पण संजू सॅमसनने एक बाजू धरून ठेवली होती. दरम्यान या डावात फलंदाजी करताना सुरुवातीचे ३ षटकार मारताच संजू सॅमसनच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

वानखेडे स्टेडियमवर संजू सॅमसनची बॅट चांगलीच तळपते. याआधी वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सेमी फायनलमध्येही त्याने इंग्लंड विरुद्ध याच मैदानावर तुफान फटकेबाजी केली होती. या सामन्यातही असच काहीसं चित्र पाहायला मिळालं. संजूने आपल्या डावातील सुरुवातीचे ३ षटकार मारताच आयपीएल स्पर्धेतील मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. संजू सॅमसन हा आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळेस एकाच डावात ३ हून अधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. संजू सॅमसनने ३४ वेळा फलंदाजी करताना एकाच डावात ३ हून अधिक षटकार मारले आहेत. या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. तर विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे.

संजू सॅमसनने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही ३ हून अधिक षटकार खेचले. तर अव्वल स्थानी असलेल्या रोहित शर्माने सर्वाधिक ४९ वेळा हा कारनामा केला आहे. तर विराट कोहलीने ४२ वेळेस एकाच डावात ३ हून अधिक षटकार खेचले आहेत. या यादीत चौथ्या स्थानी असलेल्या एमएस धोनीने देखील ३४ वेळेस हा कारनामा केला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने धोनीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. तर केएल राहुलने ३२ वेळा हा कारनामा केला आहे.

Comments are closed.