बिकाजी फूड्सचे संस्थापक शिवरतन अग्रवाल यांचे निधन

वृत्तसंस्था/चेन्नई

भारतीय पॅकेज्ड फूड इंडस्ट्रीतील दिग्गज नाव बिकाजी फूड्स इंटरनॅशनलचे संस्थापक आणि प्रख्यात उद्योजक शिवरतन अग्रवाल यांचे गुरुवारी चेन्नईत निधन झाले आहे. 74 वर्षीय अग्रवाल यांनी एका क्षेत्रीय नमकीन व्यवसायाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली होती. शिवरतन हे मागील काही काळापासून चेन्नईत वास्तव्यास होते. हल्दीराम समुहाचा पाया रचणाऱ्या प्रतिष्ठित अग्रवाल परिवारात शिवरतन अग्रवाल यांचा जन्म झाला होता. त्यांच्या बंधूंनी परिवाराच्या व्यवसायाला पुढे नेले, परंतु शिवरतन यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. 1986 मध्ये त्यांनी शिवदीप प्रॉडक्ट्ससोबत स्वत:चा प्रवास सुरू केला. यानंतर 1993 साली यांनी बिकाजी ब्रँड लाँच केला होता. हे नाव बिकानेरचे संस्थापक राव बीका यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. बिकानेरचा पारंपरिक स्वाद, विशेषकरून तेथील भुजियाला जगाच्या कानाकोपऱ्यात नेणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. आता बिकाजी केवळ भारतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नावाजलेला ब्रँड आहे.

Comments are closed.