शौचालय-नाल्याशेजारी शिंदे गटाने बसवला आरोग्य कंटेनर, संतप्त शिवसैनिकांनी ट्रक अडवला
ठाण्यातील ज्ञानेश्वरनगरात शौचालय आणि नाल्याशेजारी शिंदे गटाने आज आरोग्य कंटेनर आणून बसवला. या कंटेनरमध्ये महापालिकेचे आरोग्य केंद्र सुरू केले जाणार आहे. शौचालयाजवळच हे कंटेनर आरोग्य केंद्र कशासाठी, हा जनतेच्या जीवाशी खेळ आहे, असा संताप व्यक्त करत शिवसैनिकांनी तसेच भाजप कार्यकर्त्यांनी कंटेनर आणलेला हा ट्रक रोखून धरला. तब्बल तीन तास हे आंदोलन सुरू होते. शिंदे गटाच्या या मनमानीविरोधात शिवसैनिक व भाजप कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि मनमानी पद्धतीने आणलेला हा कंटेनर तात्काळ हटवावा अशी मागणी केली.
ज्ञानेश्वरनगर परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान होते. मात्र ते सध्या पडिक अवस्थेत आहे. या नाना-नानी पार्कच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शिवसेनेचे नगरसेवक राहाजी (गणेश) खुर्पे यांनी पालिका प्रशासनाला दिला होता. मात्र शिंदे गटाकडून या जागेवर आरोग्य केंद्र उभारण्याचा घाट घातल्याचे आले. या उद्यानाजवळ दोन शौचालये आणि बाजूलाच मोठा नाला वाहतो. त्यामुळे येथे आरोग्य केंद्र उभारू नये, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली होती. मात्र कोणत्याही परिस्थितीत या जागेवर आरोग्य कंटेनर बसवायचाच, असा डाव आखत त्या उद्यानात एका रात्रीत काँक्रीटीकरण करण्यात आले. त्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एका ट्रकमधून हा आरोग्य कंटेनर आणला. ही बाब कळताच नगरसेवक राहाजी खुर्पे यांच्यासह शिवसैनिकांनी हा ट्रक अडवून धरला. स्थानिक नागरिकांनीही धाव घेत शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे गटाच्या सुरू असलेल्या जोरजबरदस्तीविरोधात स्थानिकांच्या संतापाचा भडका उडाला.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की
हे आंदोलन टिपण्यासाठी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी मोठी गर्दी केली होती. ते आंदोलन टिपत असल्याचे पाहून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी वादावादी केली. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना आवर घालण्याऐवजी पोलिसही पत्रकारांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी काही पत्रकारांना धक्काबुक्की केली. त्यामुळे हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला.
Comments are closed.